नवी मुंबईकरांच्या सेवेत ३६ नव्या सीएनजी बसेस; वर्षभरात दीडशे बसेस खरेदीचे लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत (एनएमएमटी) ३६ नव्या सीएनजी बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसची परिवहन कार्यालयाकडे नोंदणी आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. वर्षभरात दीडशे सीएनजी बसेस खरेदीचे लक्ष्य एनएमएमटी प्रशासनाने ठेवले आहे. या नवीन बसेसमुळे नवी मुंबई शहरासह परिसरातील बसमार्गांवर बसेसच्या फेऱ्या वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एनएमएमटीच्या माध्यमातून नवी मुंबईसह पनवेल, उरण, खोपोली, कल्याण-डोंबिवली, बोरिवली मंत्रालयापर्यंत बसेस चालवल्या जातात. या सर्वच बसमार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या सर्वच मार्गांवर बसफेऱ्या वाढवण्यासाठी १५० नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने गेल्या वर्षी घेतला होता. इलेक्ट्रिक बसेस चालवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दीडशे बसेसमध्ये सीएनजीवर धावणाऱ्या गाड्यांना एनएमएमटीने प्राधान्य दिले होते. त्यापैकी ३६ बसेस एनएमएमटीच्या ताफ्यात आल्या आहेत. आणखी २० बसेस लवकर येणार आहेत. सध्या आलेल्या बसेस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच रस्त्यावर धावणार आहेत.

  • इलेक्ट्रिक बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी आणि वाहनचालक यांच्यात वाद होण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याऐवजी सीएनजी बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • या सर्व बसची खरेदी एनएमएमटीने स्वतः केली आहे. त्यामुळे या बस परिवहन उपक्रमासाठीही फायदेशीर ठरणार आहेत, असा विश्वास परिवहनच्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. बसेसची संख्या वाढल्यानंतर प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गांवर बस फेऱ्या वाढवणे शक्य होणार आहे.