
अलिबाग मधील नागावजवळच्या पाल्हे पुलावरील संरक्षण कठडा शनिवारी पहाटे अचानक ढासळला. त्यामुळे पुलाच्य सुरक्षिततेबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाची जीर्ण अवस्था पुन्ह एकदा समोर आली आहे. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजन कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान पाल्हे पुलाच संरक्षक कठडा ढासळल्याने प्रवाशांनादेखील टेन्शन आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित अधिकाऱ्यांना पाल्हे पुलाच्या धोकादायक स्थितीबाबत वारंवार निवेदने देण्यात आली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी घेऊनही पुलाच्या मजबुतीकरणाबाबत ठोस निर्णय झाला नाही. केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवरच समाधान मानण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या अलिबाग रेवदंडा मार्गावरील बेली पूल कमकुवत झाल्यामुळे संपूर्ण जड वाहतूक पाल्हे पुलावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे पुलावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत संरक्षण कठडा कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तात्पुरती दुरुस्ती
पाल्हे पुलाचा संरक्षक कठडा ढासळल्याची माहिती मिळताच सरपंच हर्षदा मयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने तात्पुरत्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून नवीन पुलाची उभारणी हाच कायमस्वरूपी तोडगा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



























































