पाचवीच्या पुस्तकात ऐश्वर्याचे ‘निंबूडा-निंबूडा’ गाणे, विद्यार्थी-पालकांमध्ये तीव्र संताप… नव्या पुस्तकामध्ये चुकाच चुका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कोणता धडा आणि कविता असावी यावर अनेकदा मतभेद होत असतात. परंतु, ओडिशामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या एका पुस्तकात चक्क बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचे प्रसिद्ध गाणे निंबूडा-निंबूडा छापण्यात आले आहे. हे गाणे पुस्तकात नेमके कशासाठी छापण्यात आले आणि विद्यार्थी या गाण्यातून काय शिकणार आहेत, असा सवाल करत विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ओडिशामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकात चुकून 1999 साली प्रसिद्ध झालेल्या ऐश्वर्या रॉयचा चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये असलेले गाणे ‘निंबूडा-निंबूडा’ छापण्यात आले आहे.

ओडिशा टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार जेव्हा पाचवी इयत्तेची पुस्तके ऑनलाइन पब्लिश करण्यात आली, तेव्हा ही चूक समोर आली आहे. ही चूक समजल्यानंतर पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे पहायला मिळत आहे. शिक्षण अधिकाऱयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एवढी मोठी चूक मुलांपर्यंत पोहोचली कशी, असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) 2020 अतंर्गत राज्यात जारी करण्यात आलेल्या नव्या पुस्तकांमध्ये तब्बल 1600 हून अधिक चुका असल्याचे समोर आले आहे. नव्या धोरणांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेल्या 55 नव्या पुस्तकांमध्ये तब्बल 1,678 चुका आढळून आल्या आहेत. या प्रकरणात ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी संबंधित अधिकाऱयांना निलंबित केले आहे.