FIFA World Cup 2026 – अखेर 68 वर्षांचा दुष्काळ संपला, फ्रान्स-स्वीडन प्रथमच वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा वर्ल्ड कपच्या जवळपास शतकभराच्या इतिहासात अनेक कट्टर प्रतिस्पर्धी वारंवार भिडले; मात्र एक आश्चर्यकारक योगायोग असा की, फ्रान्स आणि स्वीडन हे दोन बलाढय़ युरोपीय संघ कधीच विश्वचषकात एकमेकांसमोर उभे ठाकले नव्हते. तब्बल 68 वर्षांनंतर हा ऐतिहासिक योग अखेर जुळून आला असून, बुधवारी मध्यरात्री राऊंड ऑफ 32 मध्ये दोन्ही संघ प्रथमच विश्वचषकात एकमेकांना भिडणार आहेत

1958 मध्ये स्टॉकहोम येथे विश्वचषक रंगला होता तेव्हा फ्रान्स आणि स्वीडन यांच्यात अंतिम सामना होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र अवघ्या 17 वर्षांच्या पेलेने फ्रान्सचा उपांत्य फेरीत 5-2 असा पराभव करून तो सामना हुकवला. त्यानंतर दोन्ही संघ अनेकदा विश्वचषकात खेळले, पण नशिबाने त्यांना नेहमी वेगवेगळ्या मार्गाने नेले.

आजवर फ्रान्सने 76, तर स्वीडनने 54 विश्वचषक सामने खेळले आहेत. 1992 च्या युरो स्पर्धेत दोघांनी 1-1 अशी बरोबरी साधली होती. 2012 मध्ये झ्लाटन इब्राहिमोव्हिचच्या अप्रतिम व्हॉलीने स्वीडनने 2-0 असा विजय मिळवला होता. 2018 विश्वचषक पात्रता फेरीत दोन्ही संघांनी आपल्या घरच्या मैदानावर 2-1 असे विजय नोंदवले होते.

यंदाच्या स्पर्धेत मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. फ्रान्सने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकत तब्बल 10 गोल केले आणि विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे स्वीडनने सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाच्या संघांपैकी एक म्हणून बाद फेरी गाठली आहे. कागदावर फ्रान्स बलाढय़ दिसत असला तरी वर्ल्ड कपचा इतिहास एक गोष्ट पुनः पुन्हा शिकवतो की, फुटबॉलमध्ये कागदावरचे अंदाज अनेकदा हिरवळीवर कोसळतात.