
>> अभिषेक तिवारी
वास्तविक जर वर नमूद केलेल्या एसआयपीच्या कालावधीचे उदाहरण घेतले, तर आणखी एक आकडेवारी समोर येते आणि ती रंजक माहिती देते. ज्या गुंतवणूकदारांकडे व्यावसायिक सल्लागार असतो (रेग्युलर प्लॅन) ते सल्लागार नसलेल्या (डायरेक्ट प्लॅन) गुंतवणूकदारांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करताना दिसतात. जेव्हा आपण एसआयपी सुरू करतो, तेव्हा फक्त काही महिने किंवा दोन-चार वर्षांचा विचार करू नये. किमान 15 वर्षांच्या मोठय़ा खेळीचा निश्चय करावा. त्याहूनही उत्तम म्हणजे स्वतःचा एक संघ तयार करावा. एखाद्या व्यावसायिक आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. गुंतवणुकीत विविधता आणावी आणि मार्केटच्या खेळपट्टीवर टिकून राहावे. कारण या खेळात ‘वेळ’ हाच सर्वात उत्तम फलंदाज असतो.
जेव्हा तुम्ही दीर्घकालीन आणि ध्येय आधारित एसआयपी योजनेचे कसोटी क्रिकेटच्या सामन्यासारखे नियोजन करतात, त्या वेळी या सामन्यात शेअर बाजार हा तुमच्यासमोर एक कसलेला प्रतिस्पर्धी असतो. कसोटी सामन्यात जास्तीत जास्त वेळ टिकून राहिले तरच तुम्ही सामन्यात विजयाची अपेक्षा करू शकतात. मात्र क्रिकेट सामन्यासारखी परिस्थिती शेअर बाजारात अजिबात नसते. कारण इथे जसजसा वेळ पुढे सरकतो, तसतसे सामना जिंकणे अधिक सोपे होत जाते. आपण हा मुद्दा खालील उदाहरणावरून समजून घेऊ या.
असे गृहीत धरा की, तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित एखाद्या फंडामध्ये ’एसआयपी’व्दारे दरमहा 25 हजार रुपयांची गुंतवणूक करत आहात आणि या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 10 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. या परिस्थितीची तुलना अगदी कसोटी क्रिकेटच्या उदाहरणाशी करत प्रत्यक्ष आकडेवारी समजून घेऊ. प्रत्येक सत्र म्हणजे एक वर्षाची एसआयपी आहे, तर खेळाचा प्रत्येक दिवस म्हणजे तीन वर्षांचा एसआयपी टप्पा आहे. संपूर्ण सामना हा आपण 15 वर्षे कालावधी असल्याचे समजू या. या सामन्यात विजय म्हणजे तुमचे ठरवलेले आर्थिक ध्येय गाठणे हा आहे.
जर एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही या सर्व सत्रांमध्ये म्हणजेच प्रत्येक वर्षी बाजारावर वर्चस्व राखले आणि सातत्याने 10 टक्के परतावा मिळवला, तर या कसोटी सामन्याच्या शेवटी (15 व्या वर्षी) तुमच्याकडे संभाव्यतः अंदाजे एक कोटी रुपये असतील. हे अगदी सरळ आणि सोपे गणित आहे. क्रिकेट सामन्याच्या उलट तुम्ही जसे चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या जवळ पोहोचतात, म्हणजेच दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिल्याने गुंतवणुकीच्या विश्वात गोष्टी तुमच्यासाठी अधिक पटीने म्हणजेच चक्रवाढ पद्धतीने वाढण्याची शक्यता अधिक असते.
याचा थोडक्यात अर्थ असा की, जर तुम्ही एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट आखत गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर पहिल्या तीन वर्षांच्या अखेरीस तुमच्याकडे या एकूण रकमेच्या केवळ 10 टक्के रक्कम जमा होईल. दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस ती वाढून 24 टक्के होईल. याउलट गुंतवणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच कसोटी सामान्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर तुम्ही एकूण उद्दिष्टाच्या तब्बल 33 टक्के रक्कम जमा कराल. हे पुन्हा एकदा नीट समजून घ्या. पहिल्या तीन वर्षांत तुमच्या एकूण उद्दिष्टाच्या फक्त 10 टक्के रक्कम जमा होते, तर शेवटच्या तीन वर्षांत तुमच्या एकूण उद्दिष्टाच्या तब्बल 33 टक्के रक्कम जमा होते. हे फक्त आणि फक्त चक्रवाढ व्याजाच्या जादुई प्रभावामुळे होते.
वरील उदाहरण हे केवळ मूळ संकल्पना स्पष्ट करण्यासाठी दिलेले एक काल्पनिक उदाहरण आहे. मात्र व्यावहारिकदृष्टय़ा प्रत्येक तीन वर्षांचा काळ अत्यंत वेगळा असेल. कारण शेअर बाजार चढ-उतारांच्या चक्रातून वाटचाल करत असतो आणि त्यात तेजी व मंदीचे विविध टप्पे येतच असतात.
समजा आपण जानेवारी 2008 मध्ये जेव्हा शेअर बाजार एकदम तेजीत होता, तेव्हा निफ्टी 500 टीआरआयमध्ये 15 वर्षांसाठी एसआयपी सुरू केली तर काय होईल याचे एक व्यावहारिक उदाहरण घेऊ या.
तुम्ही शेअर बाजार सर्वोच्च पातळीवर गुंतवणुकीला सुरुवात केल्यामुळे (जे फक्त नंतरच समजून आले), तुमचे पहिले तीन वर्षांचे परतावे अगदीच संथ दराने होते. त्यानंतरचा दुसरा तीन वर्षांचा काळही बाजारासाठी एकाच पातळीवर रेंगाळणारा ठरला. ज्यामुळे एकूण सहा वर्षे सरासरीपेक्षा कमी परतावा मिळाला. त्यानंतर केवळ सातव्या आणि 15 व्या वर्षाच्या दरम्यानच शेअर बाजाराने समभाग या मालमत्ता वर्गात अपेक्षेप्रमाणे परतावा दिला.
एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही कशी कामगिरी केली असे तुम्हाला वाटते? तुम्ही तुमचे ठरवलेले भांडवल जमा करू शकलात का? एकूण 15 पैकी 6 वर्षांमध्ये नुकसान सोसूनही जेव्हा तुम्हाला तुमचा अपेक्षित 10 टक्के परतावा मिळाला नसला तरीही तुम्ही चांगली कामगिरी करू शकलात का?
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुम्ही खूप चांगली कामगिरी केली. कारण नंतरच्या वर्षांतील चक्रवाढ परिणामाने आपली कमाल दाखवली.
नवव्या वर्षाच्या अखेरीस तुमचे उद्दिष्ट तुम्ही ठरवलेल्या उद्दिष्टाच्या केवळ 33 टक्के होते. तथापि, पुढील सहा वर्षांच्या तेजीच्या काळामुळे तुम्ही तुमच्या उद्दिष्टाच्या 67 टक्के रक्कम जमा करू शकलात आणि शेवटच्या तीन वर्षांत तर ही रक्कम जवळपास दुप्पट झाली.
तुम्हाला हे समजले असेलच की, अनिश्चित शेअर बाजारात 15 वर्षांच्या कालावधीत नेमके काय घडेल, याचे भाकीत करण्याचा कोणताही मार्ग नाही. समजा, सुरुवातीच्या वर्षांत बाजाराने खूप चांगली कामगिरी केली आणि शेवटच्या टप्प्यात (कसोटी सामन्याचा पाचवा दिवशी खेळपट्टी खराब झाल्याप्रमाणे) बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे तुम्हाला तुम्ही निश्चित केलेली रक्कम मिळवण्यात अडथळा येऊ शकतो. एसआयपी ही भविष्यातील परताव्याची कोणतीही हमी देत नाही. ती फक्त तुम्हाला शिस्तबद्ध, खिशाला परवडणाऱ्या आणि पद्धतशीर मार्गाने अस्थिर बाजाराविरुद्ध जिंकण्याची शक्यता वाढवण्यास मदत करते, हा मुद्दा सदैव लक्षात ठेवा. याशिवाय स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि एक खरोखरच विश्वासार्ह एसआयपी योजना तयार करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यात वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांमध्ये गुंतवणूक करणे, ठरावीक अंतराने नफा काढून घेणे म्हणजेच एकूण पोर्टफोलिओचे संतुलन राखणे आणि जेव्हा बाजार स्वस्त असेल किंवा घसरलेला असेल तेव्हा जास्त गुंतवणूक करणे या काही सामान्य रणनीती तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला वैयक्तिकरीत्या हे सर्व करणे शक्य नसेल, तर एखाद्या व्यावसायिक सल्लागाराची मदत घेणे अत्यंत फायदेशीर ठरेल.
वास्तविक जर वर नमूद केलेल्या एसआयपीच्या कालावधीचे उदाहरण घेतले, तर आणखी एक आकडेवारी समोर येते आणि ती रंजक माहिती देते. ज्या गुंतवणूकदारांकडे व्यावसायिक सल्लागार असतो (रेग्युलर प्लॅन) ते सल्लागार नसलेल्या (डायरेक्ट प्लॅन) गुंतवणूकदारांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करताना दिसतात. जेव्हा आपण एसआयपी सुरू करतो, तेव्हा फक्त काही महिने किंवा दोन-चार वर्षांचा विचार करू नये. किमान 15 वर्षांच्या मोठय़ा खेळीचा निश्चय करावा. त्याहूनही उत्तम म्हणजे स्वतःचा एक संघ तयार करावा. एखाद्या व्यावसायिक आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. गुंतवणुकीत विविधता आणावी आणि मार्केटच्या खेळपट्टीवर टिकून राहावे. कारण या खेळात ‘वेळ’ हाच सर्वात उत्तम फलंदाज असतो.
(लेखक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), पीजीआयएम इंडिया ऍसेट मॅनेजमेंट आहेत.)


























































