
>> दिलीप ठाकूर
काही दिग्दर्शक आपल्या कारकिर्दीत प्रेमपट, रहस्यपट, चरित्रपट, ऐतिहासिक चित्रपट, विनोदीपट, मारधाडपट असे विविध प्रकारचे चित्रपट दिग्दर्शित करीत आपलं अष्टपैलुत्व अधोरेखित करतात तर काही दिग्दर्शक आपली एक हुकमी वाट धरतात. त्या विशिष्ट चौकटीतील गोष्टी, त्यात काही नवीन वळणे घेत आपल्या चित्रपटात दाखवतात आणि त्यात काहीही गैर नसते. आपला मनोरंजक मसालेदार चित्रपटाचा हुकमी फॉर्मुला गल्ला पेटीवर यशस्वी ठरावा अशी आणि इतकीच त्याची अपेक्षा असते. दिग्दर्शक फारुक सिद्दिकी अगदी असेच होते.
देमार घेमार, ढिश्यूम ढिश्यूम, मारधाड, ऍक्शन चित्रपट हे आपले वैशिष्टय़ त्यांनी कायम ठेवले. नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत व्हिडीओ थिएटर्स स्थिरावली होती आणि त्यात मारधाड चित्रपटांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत होता. एकपडदा चित्रपटगृहाच्या जोडीला ही आणखी एक व्यावसायिक यशाची संधी होती. फारुक सिद्दिकीसारख्या दिग्दर्शकांसाठी हे वातावरण पूरक होते. त्याच सुमारास ‘गुंडा हिरो’ अशी प्रतिमा असलेल्या अजय देवगणला अशाच भूमिकेत हिरो करत फारुक सिद्दिकीने ‘जिगर’ (1992) पडद्यावर आणला. करिश्मा कपूर त्यात नायिका आहे. हा चित्रपट यशस्वी ठरला आणि फारुक सिद्दिकीने मारधाड ऍक्शन चित्रपटात अधिकच लक्ष घातले.
त्यानंतर ‘विजयपथ’ (1994. प्रमुख भूमिकेत अजय देवगण, तब्बू, डॅनी डेन्झोपा, रिमा लागू, सुरेश ओबेरॉय, अनंत जोग), द डॉन (1995. मिथुन चक्रवर्ती, सोनाली बेंद्रे, जुगल हंसराज, असिफ शेख), विश्वविधाता (1997. जॅकी श्रॉफ, शरद कपूर, आयेशा जुल्का, पूजा बत्रा), रेवती (1997. अयूब खान, काश्मीरा शहा, किरणकुमार, श्रेयस तळपदे) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विजयपथ या चित्रपटात त्यांनी तब्बूला एक प्रकारे ‘शोभेची बाहुली’ अर्थात चकचकीत भूमिका दिली, पण हा चित्रपट यशस्वी ठरल्याने तिला पारंपरिक मसालेदार लोकप्रिय चित्रपटात भूमिका मिळू लागल्या. या चित्रपटातील ‘रुक रुक रुक, राह मे उनसे मुलाकात हो गयी, आईये आपका इंतजार है (संगीत अन्नू मलिक) ही गाणी लोकप्रिय ठरल्याने फारुक सिद्दिकीना चित्रपट संगीताची जाण आहे हे दिसून आले. त्यांच्या ‘विश्वविधाता’ या चित्रपटाला ए. आर. रेहमान यांचे संगीत आहे हे विशेष. हा चित्रपट ‘पुधिया मुगम’ या तामीळ चित्रपटाची रिमेक आहे.
फारुक सिद्दिकीनी आणखी काही मसाला मिक्स चित्रपटांचे दिग्दर्शन करताना आपल्या नायकाकडून भरपूर मारामारी करून घेतली. आणि आपले दिग्दर्शनीय वैशिष्टय़ जणू जपले. विशेष म्हणजे त्या काळातील आघाडीचे कलाकार त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात आवर्जून भूमिका साकारत हेदेखील एक प्रकारचे यशच.































































