आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरण; विद्यार्थिनींच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील तपतलाई येथील मुलींच्या अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सर्पदंश झालेल्या मुलींना तत्काळ मदत मिळाली नाही. तीस वर्षे सरकारी अनुदान घेऊनही ‘पुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेने’ विद्यार्थिनींना प्राथमिक सुविधाही पुरवल्या नसल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला असून, या आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील या आश्रमशाळेत १० ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेची नागपूर येथील अपर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली. ‘हिंदू विधिज्ञ परिषद’ या संस्थेचे कार्यकर्ते विक्रम भावे यांनी माहिती अधिकारांतर्गत हा चौकशी अहवाल मिळवला. त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

समितीला आश्रमशाळेत आढळलेल्या त्रुटी:

आश्रमशाळेत भौतिक सुविधांचा अभाव.

विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पलंग नाहीत.

वसतिगृहात खिडक्यांचे पल्ले नाहीत आणि दरवाजे तुटलेले आहेत.

वसतिगृहाच्या खिडकीजवळ जळाऊ लाकडांची साठवणूक केलेली आहे.

साठवलेल्या विटांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे.

विद्यार्थिनींना फक्त वरण-भाताचे जेवण दिले जाते.

सॅनिटरी पॅडचा पुरवठा केला जात नाही.