
साहित्य मेजवानी ही ‘रणांगण’ची खासीयत. यंदाच्या अंकात कॅन्सर या दुर्धर आजारावर डॉ. सुलोचना गवांदे, डॉ. संतोष रानडे, युनूस सय्यद आणि वैद्य परीक्षित शेवडे यांचे सविस्तर लेख देण्यात आले आहेत. भक्तीचे समाजसेवेत यथार्थ परिवर्तन व देव मंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे… दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व शंकर महाराज मठ, पुणे या संस्थांच्या सामाजिक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. ‘गाण्यातील चकवा – सुमन मासी’ हा सुमन कल्याणपूर यांच्यावरील लेख वाचनीय आहे. पूनम पवार यांचा ‘चेहरा क्या देखते हो’ व ‘मुखवटय़ामागील चेहऱयांचा झंझावात’ या दोन्ही मुलाखती छान झाल्यात. ‘चाव्या घराच्या, नव्हे मनाच्या’ व ‘पर्यायी संस्कृतीचे जनक महात्मा फुले’ हा प्रा. डॉ. गणेश राऊत यांचा विशेष लेख तसेच राजकारणावरील ‘होऊ दे चर्चा’ हा राजेश दाभोळकरांचा लेख वाचनीय आहेत.
संपादक ः डॉ. अविनाश गारगोटे
पृष्ठs ः 202, मूल्य ः 300 रुपये
अंतरीचे प्रतिबिंब
‘अंतरीचे प्रतिबिंब’ हा दर्जेदार साहित्य, वैचारिक लेखन, सर्जनशील अभिव्यक्ती आणि समकालीन सामाजिक व सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसाठी ओळखला जाणारा वैशिष्टय़पूर्ण मराठी दिवाळी अंक आहे. विविध विषयांवरील विचारप्रवर्तक लेख, साहित्यिक अभिव्यक्ती, अनुभवकथन आणि सामाजिक वास्तवाचे संवेदनशील चित्रण यांमुळे या अंकाने मराठी वाचकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या दिवाळी अंकात ‘पर्यटन’ या विषयावर विशेष विभाग साकारण्यात आला आहे. देश-विदेशातील आकर्षक पर्यटनस्थळे, अनोखे प्रवासानुभव, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, पर्यटनाचे बदलते स्वरूप तसेच भटकंतीच्या विश्वातील विविध पैलूंचा वेध घेणारे माहितीपूर्ण आणि रंजक लेख या विभागाची वैशिष्टय़े ठरली आहेत.
संपादक ः प्रज्ञा जांभेकर
पृष्ठs ः 230, मूल्य ः 400 रुपये
जॉय
या अंकात संगीता कुलकर्णी यांचा ‘अनोळखी वळणावर’, शामल कामत यांचा ‘नेत्रदान’, भूषण तांबे यांचा ‘किस्से दिवाळीचे’ हे ललित लेख वास्तववादी आहेत. डॉ. एकनाथ भोसले यांचा ‘संयुक्त कुटुंब ः पिढीतील जुळवण’ हा लेख आजच्या कुटुंब व्यवस्थेवर अचूक भाष्य करणारा असून आरोग्य विभागातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांचा आपल्या अनुभवांच्या गुंफणीतून साकारलेला आरोग्य प्रशासनावरील लेख आरोग्य विभागाला आरसा दाखवणारा आहे. ‘आंदोलनामधला तालबद्ध बदल’ हा मनीष वाघ यांचा अभ्यासपूर्ण लेख व्यवस्थेवर अचूक भाष्य करतो. अनंत बोरसे यांचे ‘… आणि फजिती झाली’ हे प्रवास वर्णन मजेशीर असून वाचताना एक चांगलीच सफर घडवते.
संपादक ः वैभव पाटील
पृष्ठs ः 76, मूल्य ः 200 रुपये





























































