
अतिरेक्यांच्या आत्मघातकी हल्ल्यांपासून दहशतवादी कारवायांचा तातडीने मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘फोर्स वन’चे पथक आता दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाच्या नियंत्रणात काम करणार आहे. गृह विभागाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. त्यामुळे ‘फोर्स वन’चे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण आता दहशतवादविरोधी पथकाकडे असणार आहे.
दहशतवादविरोधी कारवायांमध्ये प्रभावी समन्वय, एकसंध नेतृत्व, जलद निर्णयप्रक्रिया, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ‘फोर्स वन’ पथकाचे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण यापुढे दहशतवादविरोधी पथकाकडे राहील. या निर्णयामुळे फोर्स वन पथकाची विद्यमान पदसंरचना, मनुष्यबळ, आर्थिक तरतूद, सेवा आणि इतर बाबींमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
z मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अत्याधुनिक शस्त्रसज्ज आणि विशेष प्रशिक्षणप्राप्त कमांडो दल म्हणून ‘फोर्स वन’ची स्थापना करण्यात आली होती. या पथकावर दहशतवादी हल्ल्यांना प्रतिकार करणे, ओलिसांची सुटका करणे, महत्त्वाच्या आस्थापनांचे संरक्षण करणे तसेच विशेष दहशतवादविरोधी कारवाया पार पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
एकात्मिक नेतृत्व आणि समन्वय
18 वर्षांनंतर ‘फोर्स वन’चे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता हे पथक दहशतवादविरोधी पथकाच्या अखत्यारीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत दहशतवादविरोधी पथक आणि फोर्स वन या दोन्ही विशेष पथकांचे प्रशासकीय नियंत्रण स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱयांकडे असल्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात एकात्मिक नेतृत्व तसेच समन्वय साधण्यात व्यावहारिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे गृह विभागाने शासन निर्णयात नमूद केले आहे.


























































