
बदलती जीवनशैली, प्रदूषण, उन्हाचा मारा आणि अपुरी झोप यांचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग, डाग आणि निस्तेजपणा जाणवू लागतो. महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याऐवजी घरात सहज उपलब्ध असलेल्या काही भाज्यांचा त्वचेच्या निगेसाठी उपयोग करता येऊ शकतो. या भाज्यांमध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.
बीटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. बीटचा किस किंवा पेस्ट तयार करून त्यात थोडे दही मिसळावे. हा लेप चेहऱ्यावर लावता येतो. बीटचा रसही त्वचेवर लावण्यासाठी वापरला जातो. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होऊ शकते.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्वचेला थंडावा मिळतो. उन्हामुळे थकलेला चेहरा ताजातवाना करण्यासाठी काकडीचा रस कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावता येतो. काकडीच्या रसात चंदन पावडर मिसळून फेसपॅकही तयार करता येतो. तसेच डोळ्यांवर काकडीच्या चकत्या ठेवल्याने थंडावा मिळतो आणि डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात. टोमॅटोचा गर चेहऱ्यावर लावला जातो. त्यात चिमूटभर हळद मिसळूनही वापरता येतो. मात्र संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी टोमॅटोमधील नैसर्गिक आम्लामुळे जळजळ होऊ शकते, याची काळजी घ्यावी.
बटाट्याच्या चकत्या चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवता येतात. तसेच बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने त्वचेवर लावला जातो. काही जण बटाट्याच्या रसात अॅलोव्हेरा जेल आणि तांदळाचे पीठ मिसळून फेसपॅक तयार करतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ ठेवण्यास मदत होऊ शकते.
गाजरात बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. शरीरात त्याचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये होते. हे जीवनसत्त्व त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. गाजर वाफवून मॅश करावे आणि त्यात थोडे दही मिसळून फेसपॅक तयार करावा. गाजराचा रसही त्वचेच्या निगेसाठी वापरता येतो. नियमित आहारात गाजराचा समावेश केल्यानेही त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळतात.

























































