
चहा असो किंवा भाजी, स्वयंपाकघरात आल्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. आल्यामुळे पदार्थांची चव वाढतेच, शिवाय त्याचा वापर घरगुती उपायांमध्येही केला जातो. त्यामुळे अनेकजण एकाच वेळी भरपूर आले खरेदी करून ठेवतात. मात्र योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास आले लवकर सुकते, मऊ पडते किंवा त्याला बुरशी येते. काही सोप्या टिप्स वापरल्यास आले अधिक काळ ताजे ठेवता येऊ शकते.
आले खरेदी केल्यानंतर ते धुऊन लगेच साठवण्याऐवजी त्यावरील माती कोरड्या कापडाने स्वच्छ करावी. आले पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करावी. त्यानंतर ते हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजच्या क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवावे. योग्य पद्धतीने साठवलेले संपूर्ण आणि न सोललेले आले साधारण तीन ते चार आठवडे टिकू शकते.
अनेकदा स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी आपण एकाच वेळी जास्त आले सोलून ठेवतो. मात्र सोलल्यानंतर आले हवेशी अधिक संपर्कात येते आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोललेले आले प्लास्टिक रॅपमध्ये व्यवस्थित गुंडाळून हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवावे. अशा प्रकारे ते साधारण दोन ते तीन आठवडे टिकू शकते.
किसलेले आले संपूर्ण आल्यापेक्षा लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे ते स्वच्छ आणि कोरड्या हवाबंद डब्यात ठेवावे. फ्रिजमध्ये साठवलेले किसलेले आले साधारण एक आठवड्याच्या आत वापरणे योग्य ठरते. शक्यतो एकाच वेळी जास्त प्रमाणात आले किसून ठेवू नये.
आले अधिक काळ टिकवून ठेवायचे असल्यास फ्रीजर हा चांगला पर्याय आहे. संपूर्ण आले किंवा किसलेले आले हवाबंद डब्यात किंवा फ्रीजरसाठी योग्य पिशवीत ठेवून गोठवता येते. योग्य प्रकारे साठवलेले आले साधारण सहा महिन्यांपर्यंत वापरता येऊ शकते. गरजेनुसार फ्रीजरमधून थोडे आले काढून किसता येते.
आले खराब झाले आहे की नाही, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. आल्याचा रंग बदलून ते तपकिरी पडू लागले, त्याला सुरकुत्या पडल्या, ते खूप मऊ किंवा चिकट झाले अथवा त्यावर बुरशी दिसू लागली, तर ते वापरू नये. विशेषतः बुरशी आलेले आले फेकून देणेच सुरक्षित आहे.




























































