
>> चंद्रशेखर केशव गोखले , लेखक, कवी, अभिनेता
भारतीय लोकशाहीवर सध्या जो आघात होत आहे, तो निव्वळ पक्षांतराचा मुद्दा नाही, तर ही लांच्छनास्पद रीतीने लोकशाहीची केलेली हत्या आहे. एका राजकीय टोळीने उघड उघडपणे, सरकारी संरक्षणात केलेला लोकशाहीचा हा खून आहे. कायद्याच्या रक्षकांच्या उपस्थितीत, घटनात्मक संस्थांच्या साक्षीने हा प्रकार घडत आहे.
शिवसेनेचे सहा खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे डझनभर आमदारांचे पक्षांतर हा केवळ एक घटनाक्रम नाही, तर हा मतदाराने दिलेल्या जनादेशाचा अवमान आहे. यामागे विचारधारेचा संघर्ष नसून सत्ताप्राप्तीसाठी रचलेले संघटित कारस्थान दिसते.
केवळ शिवसेना व तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर गेल्या दशकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (संयुक्त), आरजेडी, बसपा, समाजवादी पक्ष, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, आप आदी पक्षांमध्ये झालेली फूट पाहता विरोधी पक्षांची शक्ती पद्धतशीरपणे क्षीण करण्याचा प्रयत्न स्पष्ट होतो. महाराष्ट्र, बिहार, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश येथील राजकीय घडामोडी याच मालिकेतील दुवे आहेत.
सत्तालालसा इतकी टोकाला गेली आहे की, कालपर्यंत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली असलेले नेते आज सत्ताधारी पक्षात प्रवेश करताच ‘निर्दोष’ ठरत आहेत. तपास यंत्रणांच्या फायली पक्षांतरानंतर बंद होतात. हा ‘भ्रष्टाचाराला राजाश्रय’ देण्याचाच प्रकार आहे.
अफाट पैशांची उधळपट्टी करून पंचतारांकित हॉटेलांमध्ये आमदारांना ठेवले जाते. शेतकरी कर्जमाफीसाठी निधी नाही म्हणणारे सरकार लोकप्रतिनिधी खरेदीसाठी मात्र मुक्तहस्ते खर्च करते. हा जनतेच्या करातील पैसा आहे.
सामान्य मतदार या सर्व घडामोडींमध्ये केवळ असहाय्य प्रेक्षक बनला आहे. त्याने दिलेले मत बाजारात विकले जात आहे. अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी जपलेले सुसंस्कृत राजकारण आज लयाला गेले आहे.
अशा परिस्थितीत जनतेसमोर एकच प्रश्न आहे – या गिधाडांचे राज्य असेच चालू ठेवायचे की, त्यांना धडा शिकवून त्यांचे राजकारण संपवायचे? की यांनाच पुन्हा निवडून देऊन लोकशाहीच्या हत्येचे समर्थन करायचे? याचे उत्तर मतदारांनीच द्यायचे आहे.


























































