लोडबेअरिंगचा लोखंडी सांगाडा कोसळला; दबलेल्या मजुराची साडेपाच तास झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यातील बीड-आडवली येथील सना झरा रिसॉर्टमध्ये बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब आणि लोडबेअरिंग कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका कामगाराला बाहेर पडण्यासाठी तब्बल साडेपाच तास झुंज द्यावी लागली. दुर्घटना घडल्यानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन साडेपाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला ढिगाऱ्यातून जखमी अवस्थेत बाहेर काढले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचान सुरू आहेत. या दुर्घटनेत अन्य पाच कामगारही जखमी झाले आहेत.

बीड-आडवलीजवळील सांगवी येथे अब्बास शेख यांचे सना झरा रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये एक महिन्यापूर्वी स्लॅबचे काम करण्यात आले होते. तिसऱ्या मजल्यावर लादी बसवण्याचे काम सुरू असतान स्लॅबवर अतिरिक्त भार आल्याने लोखंडी सांगाडा वाकला आणि कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा सहा कामगार काम करत होते. यातील पाच कामगारांनी वेळीच पळ काढल्याने ते बालबाल बचावले. मात्र मनोज लोखंडी पाइप आणि स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला. याची माहिती मिळताच पोलीस आणि खोपोली हेल्प फाऊंडेशनचे गुरुनाथ साठेलकर व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. क्रेन, जेसीबी, गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी पाइप कापत साडेपाच तासांनी त्याची सुखरूप सुटका केली. गंभीर जखमी झालेल्या मनोजला उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान कुठल्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता हे बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे.