
ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि प्रख्यात राजकीय विश्लेषक चंद्रशेखर कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 61 वर्षे होते. होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे संस्थापक शास्त्रज्ञ तसेच ख्यातनाम विज्ञान लेखक प्रा. वि. गो. कुलकर्णी यांचे सुपुत्र होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या 1 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून, डिजिटल आणि प्रिंट माध्यमांनी एक अभ्यासू, निर्भीड आणि संवेदनशील पत्रकार गमावला आहे.
तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. लोकमत, लोकसत्ता आणि सकाळ यांसारख्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध वरिष्ठ पदांवर कार्य करत आपल्या लेखणीचा ठसा उमटवला. सखोल अभ्यास, वस्तुनिष्ठ मांडणी आणि परखड विश्लेषण ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये होती.
प्रिंट माध्यमांसह विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय आणि सामाजिक घडामोडींवरील विश्लेषक म्हणूनही ते नियमितपणे सहभागी होत असत. समकालीन राजकारण, जागतिक घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल यांवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट भूमिका मांडल्या.
पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. 2017 मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी विज्ञान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. विज्ञान आणि समाज यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील एक अभ्यासू, विवेकी आणि प्रभावी आवाज कायमचा हरपला आहे.


























































