
मोठ्या विश्रांतीनंतर मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे घाटकोपर, भांडुप, मुलुंड, अंधेरी, मालाड, किंग्ज सर्कल आदी सखल भागात पावसाचे पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिकेकडे नोंदविण्यात आल्या. पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला.
हवामान खात्याने मुंबईसाठी सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला होता. मंगळवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात, शहर भागात ३७.५० मिमी, पूर्व उपनगरात – ११३.२७ मिमी तर पश्चिम उपनगरात ८४.२७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. सकाळी पावसाचा जास्त जोर नव्हता. मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
झाडे, फांद्या पडल्याच्या ३४ तक्रारी
मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहर भागात पाच ठिकाणी, पूर्व उपनगरात १२ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात १७ ठिकाणी अशा एकूण ३४ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मुंबईत पाऊस पडत असताना शहर, पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात प्रत्येकी एका ठिकाणी याप्रमाणे तीन ठिकाणी घरे, भिंती यांचा काही भाग पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाले नाही. शहरात मुसळधार पाऊस पडत असताना शहर भागात ९ ठिकाणी, पूर्व उपनगरात दोन ठिकाणी तर पश्चिम उपनगरात पाच ठिकाणी अशा एकूण १६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ लाख दशलक्ष लिटर कमी पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर तलावात तसेच विहार, तुळशी तलावातदेखील काहीसा चांगला पाऊस पडला. त्यामुळे सात तलावांत सोमवारी सकाळपर्यंत १,००,२७९ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात सात तलावांत ५,७१,६७० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा होता. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावांत तब्बल ४,७१,३९१ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची कमी दिसून येते.
मुसळधार पावसात लोकल सेवा कोलमडली
शहरात रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुसळधार हजेरी लावलेल्या पावसात तिन्ह रेल्वे मार्गावरील लोकल सेवेच्चे वेळापत्रक कोलमडले. ‘पीक अवर्स’ला ट्रेन तब्बल २० ते ३५ मिनिटे उशिराने धावल्यामुळे नोकरदारांचे हाल झाले. पश्चिम रेल्वेवर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावल होता, तर मध्य रेल्वेच्या मेन् लाइन आणि हार्बर लाइनवर सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्य विलंबाने धावत होत्या.




























































