ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्याची भिंत कोसळली, पर्यटकांचा जीव धोक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाईंदरमधील ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्यावरील तटबंदीला लागून असलेल्या एका खोलीची भिंत कोसळली. या घटनेमुळे किल्ल्याच्या वास्तुसंवर्धनाचा आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

उत्तन परिसरातील डोंगरावर वसलेला जंजिरे-धारावी किल्ला हा ऐतिहासिक वारसा आहे. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला उभारलेला हा किल्ला १७३९ मध्ये नरवीर चिमाजी आप्पा यांच्या मोहिमेनंतर पोर्तुगीजांकडून मराठ्यांच्या ताब्यात आला. वसई किल्ल्याच्या संरक्षणासाठी तसेच अरबी समुद्रावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून या किल्ल्याला महत्त्व आहे. या किल्ल्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या तटबंदी परिसरातील दोन खोल्यांपैकी एका खोलीची दगडी भिंत कोसळली आहे. त्यामुळे उर्वरित तटबंदी आणि इतर वास्तूंचीही तातडीने पाहणी करून संरक्षणाची कामे करण्यात यावीत, अशी मागणी गडप्रेमींनी केली आहे.

लालफितीमुळे काम लटकले
जंजिरे धारावी किल्ल्याची पुनर्बाधणी आणि सुशोभीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, त्यातील १० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्गही झाले. महापालिकेने किल्ल्याच्या विकासाचा आराखडाही तयार केला. मात्र किल्ल्यावरील जागेचा ताबा आणि इतर प्रशासकीय अडचणींच्या लालफितीमुळे सगळे काम अद्याप लटकले आहे.