
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत राज्यातील एका शेतकरी महिलेच्या खात्यात केवळ एक पैसा जमा झाल्याचा दावा करण्यात आला. खरं तर खात्यात २००० रुपयांचा हप्ता अपेक्षित होता. मात्र जेव्हा तिच्या मोबाईल फोनवर आलेल्या एका मेसेजमध्ये तिच्या खात्यात केवळ एक पैसा जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर ती गोंधळात पडली.
भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा गावातील ६५ वर्षीय लाभार्थी महिलेचा मुलगा खेमराज गिरेपुंजे याने सांगितले की, जेव्हा त्याच्या आईला, लक्ष्मीबाई यांना, या योजनेचा हप्ता म्हणून त्यांच्या बँक खात्यात ०.०१ रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, तेव्हा संपूर्ण कुटुंब गोंधळात पडले. त्याने सांगितले की, महत्त्वाचा असलेला खरीप पेरणीचा हंगाम सुरू होत असल्यामुळे त्यांना बियाणे आणि खतांसाठी या पैशांची तातडीने गरज होती.
कृषी विभागाने मात्र मंगळवारी स्पष्ट केले की, तो मेसेज एका तांत्रिक चुकीमुळे आला होता आणि मुख्य हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय आधीच जमा करण्यात आला आहे.
भंडारा जिल्हा कृषी अधिकारी संगीता माने यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक बिघाडामुळे लाभार्थ्याला तो मेसेज गेला असावा. त्यांनी नमूद केले की नोंदीनुसार, शेतकरी महिलेच्या बँक खात्यात नेहमीप्रमाणे २००० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे.





























































