खवळलेल्या समुद्रात थरार… भारतीय तटरक्षक दलाने सहा मच्छीमारांना वाचवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकातील मंगळुरू किनाऱ्यालगत खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या मासेमारी नौकेवरील सहा मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलाने धाडसी बचाव मोहिमेद्वारे सुखरूप बाहेर काढले. उंच लाटा, ताशी वेगाने वाहणारे वारे, कमी दृश्यमानता आणि वाढता अंधार अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे बचावकार्य यशस्वीपणे पार पाडण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता मंगळुरूजवळील सुरतकल किनाऱ्यापासून सुमारे 33 नॉटिकल मैलांवर असलेल्या ‘मंजू माथा’ या भारतीय मासेमारी नौकेकडून व्हीएचएफ (VHF) रेडिओद्वारे आपत्कालीन संदेश प्राप्त झाला. खराब हवामानामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे नौकेत पाणी शिरू लागले आणि नौकेच्या तळालाही गंभीर नुकसान झाले. परिणामी, नौकेवरील सहाही मच्छीमारांच्या जीवाला धोका निर्माण झाला.

 

मदतीचा संदेश मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे ‘आयसीजीएस सचेत’ हे जहाज तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अवघ्या 90 मिनिटांत बचाव पथक संकटग्रस्त नौकेजवळ पोहोचले. मात्र समुद्रातील परिस्थिती, वेगवान वारे, कमी दृश्यमानता आणि अंधारामुळे ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक ठरली. तरीही तटरक्षक दलाच्या जवानांनी धैर्य, कौशल्य आणि अचूक समन्वयाचे दर्शन घडवत विशेष रिमोट-ऑपरेटेड लाइफबॉयच्या साहाय्याने एकामागोमाग सर्व सहा मच्छीमारांना सुरक्षित बाहेर काढले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाले. विशेष म्हणजे, या संपूर्ण मोहिमेत कोणत्याही मच्छीमाराला दुखापत झाली नाही. बचाव कार्यानंतर आयसीजीएस सचेत हे जहाज सर्व मच्छीमारांना घेऊन न्यू मंगळुरू बंदराकडे रवाना झाले. तेथे आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या.

या यशस्वी मोहिमेमुळे भारतीय तटरक्षक दलाने पुन्हा एकदा आपल्या तात्काळ प्रतिसाद क्षमतेचा, उत्कृष्ट समुद्री कौशल्याचा आणि समुद्री सुरक्षेबाबतच्या कटिबद्धतेचा प्रत्यय दिला. ‘वयम् रक्षामः’ या ब्रीदवाक्याला साजेशी ही कामगिरी असल्याचे तटरक्षक दलाने नमूद केले. संकटाच्या क्षणी जीव वाचवण्यासाठी तटरक्षक दल सदैव सज्ज असल्याचे या मोहिमेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.