सिंहगड रोड परिसरात पाण्याच्या पाईपमध्ये अडकला गवा, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 28 अंतर्गत येणाऱ्या जनता वसाहत रोड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पाण्याच्या पाईपसाठी तयार करण्यात आलेल्या जागेत एक गवा अडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गव्याची सुटका करण्यासाठी सध्या प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य राबवले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी, वनविभाग, रेस्क्यू (RESQ) टीम आणि स्थानिक पोलीस यंत्रणेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासोबतच सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त वाघमोडे साहेब आणि आरोग्य निरीक्षक प्रियांका कंक हे देखील प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण बचावकार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गव्याला कोणतीही दुखापत किंवा इजा न होता त्याला अत्यंत सुरक्षितपणे बाहेर काढणे हे प्रशासनापुढील मुख्य आव्हान आहे. त्यासाठी वनविभाग, पालिका आणि पोलीस प्रशासन या सर्वच यंत्रणा परस्परांशी योग्य समन्वय साधून गव्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.