
कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या एका हिंदू व्यक्तीवर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर एका मुस्लिम महिलेने त्या व्यक्तीवर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. माणुसकीला कोणताही धर्म नसतो, अशीच प्रचीती या घटनेने दिली. केरळमधील कासारगोड जिह्यात ही घटना घडली. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्या मुस्लिम महिलेचे तोंडभरून कौतुक केले आहे.
केरळच्या कासारगोड जिह्यात एका हिंदू व्यक्तीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. या मृत व्यक्तीची ओळख नारायणन अशी असून गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्याने मंजेश्वर विभागाच्या प्रतिनिधित्व करणाऱया कासारगोड जिल्हा पंचायतीच्या सदस्या इरफाना इक्बाल यांनी नारायणन (64) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली. कारण नारायणन यांचे कुटुंबीय दोन दिवसानंतरही त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले नव्हते.
दोन बायका, मुले तरीही कोणी नाही आले
नारायणन यांचे दोन विवाह झाले होते. त्यांना दोन्ही पत्नींपासून मुले होती. मात्र, तरीही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना काही महिन्यांपूर्वीच वाऱ्यावर सोडून दिले होते, ते त्यांचा सांभाळ करत नव्हते. कोझिकोड येथील एका रुग्णालयात नारायणन यांचे निधन झाले. मात्र, त्यानंतरही त्यांचं कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले नाही. त्यानंतर इरफाना यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांची लेखी संमती घेत त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे इरफाना यांनी सांगितले.




























































