अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची नुकसानभरपाई लटकली, सरकारकडे प्रस्ताव पाठवला दोन कोटींचा; मिळाले फक्त ७० लाख; वर्ष संपले, रायगडातील बळीराजाचे डोळे मदतीकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे अस्मानी संकट येऊन एक वर्ष लोटले असले तरी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची नुकसानभरपाई लालफितीत अडकली आहे. अवकाळी पावसात सुमारे अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे आणि फळबागांचे आतोनात नुकसान झाले होते. मे २०२५ मध्ये अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडे १ कोटी ८० लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला असला तरी त्यापैकी केवळ ७० लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. एक कोटी १० लाख रुपयांचा निधी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

शेतकऱ्यांची चेष्टा

मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत आम्हाला नुकसानभरपाई मिळाली नाही. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा केल्यासारखा आहे. शेतकऱ्यांकडे सरकार गांभीयनि पाहत नाही. त्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत रोहा येथील शेतकरी रोहन जाधव यांनी व्यक्त केली आहे.

सरकारची दुटप्पी भूमिका
एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे असे दाखवायचे व दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घ्यायचा, अशी सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचे दिसून येते. अवकाळी पावसामुळे नुकसान होऊन वर्ष उलटले तरी अद्यापपर्यंत सरकारकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी अलिबागमधील शेतकरी संजय शिंदे यांनी केली आहे.

एप्रिल महिन्यात अचानक मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे तब्बल २ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा बाधित झाल्या होत्या. या पावसाचा जिल्ह्यातील ६ हजार ५७८ शेतकऱ्यांना फटका बसला होता. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे हापूसच्या बागांमध्ये कैऱ्यांचा खच पडल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने एक कोटी ८० लाख रुपये मदत निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. मात्र शासनाच्या स्तरावर त्यापैकी फक्त ७० लाख रुपयांचा निधी मंजर करण्यात आला आहे.

बदलत्या हवामानामुळे जोखीम वाढली

बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस अधिक जोखमीचा बनत चालला आहे. अवेळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. एप्रिल २०२५ मधील अवेळी पावसामुळे ६०९.८ हेक्टर क्षेत्रावरील फळपीक व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी १ हजार ८९० शेतकरी बाधित झाले होते. त्यानंतर मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ४ हजार ६८८ शेतकऱ्यांच्या १ हजार ८६८.३ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती आणि फळबागांचे नुकसान झाले होते. लागोपाठ आलेल्या दोन संकटांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.