
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज एरॉन समर्स पुन्हा एकदा गंभीर कायदेशीर अडचणीत सापडला असून, एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात त्याने तस्मानियाच्या सर्वोच्च न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. 30 वर्षीय समर्सवर 2018 मध्ये बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सचा भाग होता, तेव्हा सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलीशी संपर्क साधून तिचे शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्याने न्यायालयात दोन लैंगिक शोषणाचे आणि अन्य आरोप मान्य केले असून, न्यायालयाने त्याची जामीन याचिका फेटाळत त्याला कोठडीत पाठवले आहे. याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात तस्मानियाचे सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल सुनावणार असून, समर्सला दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे.
एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख आणि सर्वात वेगवान गोलंदाज मानल्या गेलेल्या समर्सचे क्रिकेट करिअर आता पूर्णपणे संपुष्टात आले आहे. समर्सच्या वकिलांनी न्यायालयात तो मानसिक तणावातून जात असल्याचे सांगत निलंबित शिक्षेची मागणी केली होती. मात्र न्यायाधीश हेलेन वुड यांनी ती फेटाळून लावली. विशेष म्हणजे, समर्सचा हा पहिलाच गुन्हा नसून यापूर्वी 2021 मध्येही त्याला बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह सामग्री बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तस्मानियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने आपल्या कारकीर्दीत 7 लिस्ट-ए आणि 3 टी-२० सामने खेळले आहेत.





























































