
सोशल मीडियावरील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्सना व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा धाडसी प्रयोग म्हणजे समीर खांडेकर लिखित-दिग्दर्शित ‘बनवाबनवी’. या नाटकात भूमिका करणारे सर्व कलावंत सोशल मीडियावर लाखोंनी फॉलोअर्स असलेले पंटेट क्रिएटर्स असून ते प्रथमच रंगभूमीवर पाऊल ठेवत आहेत.
हॉरर आणि कॉमेडीचा मिलाफ असलेले हे नाटक पारंपरिक रंगभूमीपेक्षा एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करते.
बॅचलर पार्टीसाठी गेलेल्या आणि एका झपाटलेल्या व्हिलात अडकलेल्या मित्रांची कथा भीती आणि विनोद यांचा समतोल साधत पुढे सरकते. विशेष म्हणजे, नाटकाचे नाव आधी ठरवून त्यानंतर कथा आणि पात्रांची बांधणी करण्यात आली, ही त्यामागची आगळी संकल्पना आहे.
सुमित चव्हाण, ऋषभ मोरे, सोनाली गुरव, सुधाकर सोनवणे, ओमकार कदम, सिद्धी पोतदार आणि शंतनू रांगणेकर या सहा कलाकारांनी रंगभूमीवर पदार्पण करताना उत्साह आणि सहजता दाखवली आहे. त्यांच्या डिजिटल विनोदशैलीचा प्रभाव नाटकात जाणवतो. समीर खांडेकर यांनी या कलाकारांच्या स्वाभाविक शैलीचा योग्य वापर करत नाटकाची मांडणी केली आहे.
पारंपरिक नाटय़रसिकांसह नव्या पिढीला रंगभूमीकडे आकर्षित करण्याची क्षमता ‘बनवाबनवी’मध्ये निश्चितच आहे. या प्रयोगाची दखल नाटय़रसिकांनी हे नाटक पाहून घ्यावे, जेणेकरून असेच वेगवेगळे प्रयोग मराठी रंगभूमी अधिक समृद्ध करतील.



























































