FIFA World Cup 2026 – वर्ल्ड कप राऊंड अप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेक्सिकोच्या जल्लोषाला गालबोट

मेक्सिकोच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना दुर्दैवी घटना घडली. राजधानीत हजारो चाहते रस्त्यावर उतरले होते. फटाक्यांची आतषबाजी, नृत्य आणि घोषणाबाजी सुरू असतानाच काही ठिकाणी प्रचंड गर्दी झाली. या गोंधळात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होऊन तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. विजयाचा आनंद क्षणात शोकात बदलला. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नॉर्वेच्या चाहत्यांचा व्हायकिंगजल्लोष

नॉर्वेने आयव्हरी कोस्टला पराभूत करून बाद फेरीत प्रवेश मिळवल्यानंतर नॉर्वेमध्ये आनंदाचा अक्षरशः उधाण आले. हजारो चाहते पारंपरिक ‘व्हायकिंग रो’ करत रस्त्यावर उतरले. ढोल, रणशिंगे, ध्वज आणि पारंपरिक पोशाखामुळे संपूर्ण वातावरण एखाद्या ऐतिहासिक उत्सवासारखे दिसत होते. काही ठिकाणी उत्साहाच्या भरात सार्वजनिक मालमत्तेचे किरकोळ नुकसान झाले. तरीही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. नॉर्वेच्या फुटबॉल इतिहासातील हा मोठा टप्पा असल्याने चाहत्यांचा उत्साह स्वाभाविक असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

विक्रम नको, वर्ल्ड कप हवा

किलियन एम्बाप्पे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोलांच्या विक्रमाच्या उंबरठय़ावर उभा आहे. तरीही त्याचे लक्ष वैयक्तिक विक्रमांवर नाही. मला ‘गोल्डन बूट’पेक्षा वर्ल्ड कपची ट्रॉफी महत्त्वाची आहे, असे त्याने स्पष्ट सांगितले. या वक्तव्याने फुटबॉलप्रेमींना त्याच्या परिपक्वतेची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. अनेक महान खेळाडू वैयक्तिक विक्रमांचा पाठलाग करतात, मात्र एम्बाप्पेने संघाला प्राधान्य दिले आहे. फ्रान्सच्या ड्रेसिंगरूममध्येही त्याची हीच भूमिका असल्याचे सहकाऱयांनी सांगितले. त्यामुळे एम्बाप्पे हा सुपरस्टार नसून संघासाठी झटणारा नेता असल्याचे मत फुटबॉल तज्ञ व्यक्त करत आहेत.

फ्रान्सची गोलमशीन

फ्रान्सने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक प्रभावी कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये स्थान मिळवले आहे. साखळी आणि बाद फेरी मिळून चार सामन्यांत फ्रान्सने तब्बल 13 गोल झळकावले असून केवळ दोन गोल स्वीकारले आहेत. आक्रमणात एम्बाप्पे, बचावात मजबूत साखळी आणि मधल्या फळीत अचूक नियंत्रण यामुळे फ्रान्सचा खेळ संतुलित दिसत आहे.