
किलियन एम्बाप्पे फॉर्मात आला तर त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि याचाच प्रत्यय बाद फेरीच्या पहिल्याच सामन्यात आला. भन्नाट वेग, चपळता आणि अचूकता या तिन्ही गोष्टींचा सुरेख मिलाफ यावेळी एम्बाप्पेच्या खेळात पाहायला मिळाला. एम्बाप्पेने फक्त या सामन्यात दोन गोलच केले नाहीत, तर त्याने बरेच विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. एम्बाप्पेच्या दिमाखदार कामगिरीच्या जोरावर फ्रान्सला स्वीडनवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवता आला. एम्बाप्पेच्या या अविस्मरणीय कामगिरीमुळे साखळी फेरीत अपराजित राहिल्यानंतर, फ्रेंच संघाने बाद फेरीच्या सामन्यांमध्येही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
पहिल्या सत्रामध्ये फ्रान्सचे एकतर्फी वर्चस्व
फ्रान्स संघाने सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. फ्रान्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि स्वीडिश बचावावर सतत हल्ले चढवले. फ्रान्सने पहिल्या सत्रामध्ये एकूण 15 शॉट्स मारले. पण या काळात नशिबाने फारशी साथ दिली नाही. एम्बाप्पेचा एक गोल ऑफसाईडमुळे रद्द करण्यात आला, तर त्याचा दुसरा शॉट पोस्टला लागून चुकला. पण एम्बाप्पेच्या प्रयत्नांना पहिल्या हाफच्या इंज्युरी टाइममध्ये (अतिरिक्त वेळेत) यश आले. एम्बाप्पेने मिळालेल्या संधीचे सोने करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
फ्रान्सचा डबल धमाका
फ्रान्सने दुसऱ्या सत्रामध्येही दबाव कायम ठेवला. त्यामुळेच सामन्याच्या 53 व्या मिनिटाला ब्रॅडली बारकोलाने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतरही एम्बाप्पेची जादू ओरली नव्हती. पहिल्या सत्रातील आक्रमण त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. सामन्याच्या
74 व्या मिनिटाला एम्बाप्पेने पुन्हा एकदा गोल केला आणि फ्रान्ससाठी 3-0 असा विजय निश्चित केला.
फ्रान्सचा पुढचा सामना कधी…
एम्बाप्पेच्या बेदरकार खेळामुळे आता फ्रान्सचा पुढचा सामना कधी आहे, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. फ्रान्सचा संघ आता 4 जुलैला फिलाडेल्फिया येथे अव्वल 16 संघांच्या फेरीतील सामन्यात पॅराग्वेचा सामना करेल.



























































