
विजयाबाई मेहता म्हणजे नाट्यक्षेत्राची मूर्तिमंत प्रयोगशाळाच होती. त्यांनी अभिनय केला, नाट्य दिग्दर्शन केले, चित्रपट दिग्दर्शित केले, टेलिफिल्म्स केल्या, मालिकाही केल्या. शिवाय नाट्य प्रशिक्षक म्हणून अनेक नामांकित रंगकर्मीही नाट्यसृष्टीला दिले. जागतिक रंगभूमीची ओळख महाराष्ट्राला घडवली आणि रंगभूमीवरील हा ‘झिम्मा’ संपवून विजयाबाई आता स्वर्गस्थ झाल्या आहेत. नाट्यशास्त्रज्ञ असलेली ही नाट्यदेवता अखेरच्या प्रवासाला निघाली आहे. देवादिकांनो, पडदा दूर करा, विजयाबाईंचे स्वागत करा!
मराठी नाट्यसृष्टीला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणाऱ्या विजयाबाई गेल्या. विजयाबाई मेहता म्हणजे केवळ मराठीच नव्हे, तर भारताच्या प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील एक तेजस्वी दीपस्तंभ! आता हा दिवा शांत झाला आहे. असंख्य रंगकर्मीं घडविणाऱ्या, अनेक नाट्यकृती जन्माला घालणाऱ्या, कितीतरी नाट्यकर्मी घडवणाऱ्या व नाटकवेड्या रंगकर्मींना नाटकाचे, अभिनय कौशल्याचे धडे देणाऱ्या विजयाबाईंची थोरवी सांगावी तरी किती! एका ओळीत सांगायचे तर विजयाबाई मेहता हे नाट्यकलेचे चालते-बोलते विद्यापीठ होते. कुठल्याही विशिष्ट चाकोरीत न बसणारे, कुठल्याही छापील अभ्यासक्रमाच्या संकुचित चौकटीत न बसणारे व पारंपरिक आणि आधुनिक नाट्यकलेचा सुंदर मेळ घालत जागतिक रंगभूमीला कवेत घेण्याचे विलक्षण सामर्थ्य असलेले जिवंत विद्यापीठ म्हणजे विजयाबाई! रंगमंचावर केवळ इकडून तिकडे व तिकडून इकडे जात संवादफेक करणे म्हणजे अभिनय हे विजयाबाईंना मान्य नव्हते. उच्च रवातील संवादानेच अभिनयाची छाप पडते हेही त्यांना अमान्यच. सौम्य आवाजातही प्रेक्षकांना खिळवून ठेवता येते यावर त्यांचा विश्वास होता. सहजपणे कुठले तरी काम करत, अगदी भाजी वगैरे निवडत केलेल्या संवादातून नाटकात जिवंतपणा ओतण्याचा प्रयोग विजयाबाईंनी केला, तो यशस्वी झाला आणि रसिकांनाही भावला. एका नाटकापूर्वी विजयाबाईंनी तीन महिने फक्त एका वृद्ध स्त्रीप्रमाणे चालण्याचा सराव केला. त्या स्त्री पात्राच्या संपूर्ण आयुष्यातील संघर्षाचा थकवा त्यांना चालताना दिसायला हवा होता. भूमिकेत प्राण ओतण्याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. अभिनयात संवाद लक्षात ठेवणे सोपे असते, पण शरीराच्या माध्यमातून भूमिका साकारणे हे कठीण असे त्या मानत. नटाने स्वतःपेक्षा भूमिकेला, व्यक्तिरेखेला आणि पात्राला मोठे करावे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. आपल्या कठोर शिस्तीने विजयाबाईंनी मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत मुक्त संचार केला. पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत, त्यानंतर विजया खोटे व पहिल्या पतीच्या निधनानंतर झालेल्या विजया मेहता या एकाच आयुष्यातील तीन भूमिका वठवत विजयाबाईंनी जो
नाट्य प्रवास
केला किंवा जो नाट्य प्रवास रसिकांना घडवला तो नक्कीच सोपा नव्हता. मात्र कलासक्त मन, ‘नाटक’ या तीन अक्षरांविषयी असलेली अपार ओढ आणि सतत नवनवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास या त्रिसूत्रीच्या जोरावर विजयाबाई नाट्यकलेच्या क्षेत्रात मनसोक्त विहार करीत राहिल्या. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्राची पदवी घेत असतानाच ज्येष्ठ मराठी समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी सर्वात आधी त्यांच्यातील नाट्यगुण हेरले. वाङ्मय मंडळाच्या एका कार्यक्रमात एका उताऱ्याचे विजयाबाईंनी केलेले अभिवाचन ऐकून प्रा. कुलकर्णी यांनी त्यांना नाटकात काम करण्याची सूचना केली. ती विजयाबाईंनी तत्काळ अमलात आणली. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या नामांकित नाट्य संस्थेत इब्राहिम अल्झी आणि मर्झबान यांच्याकडून नाट्यक्षेत्राचे धडे घेतल्यानंतर भारतीय विद्या भवन व मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्य प्रयोगांतून अभिनेत्री म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. ‘ऑथेल्लो’ या जगप्रसिद्ध नाटकाचे मराठी रूपांतर ‘झुंजारराव’ या नाटकातील ‘कमळजा’ या भूमिकेपासून त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला. ‘संशयकल्लोळ’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘मेनका’, ‘सुंदर मी होणार’ इत्यादी नाटकांत कामे करूनही त्यांचे मन रमेना. केवळ अभिनय करून थांबतील त्या विजयाबाई कसल्या! नावीन्याचा ध्यास असणाऱ्या विजयाबाईंनी 1960 च्या सुमारास प्रसिद्ध नाट्य लेखक विजय तेंडुलकर, दिग्दर्शक, अभिनेते अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू या दिग्गजांच्या सोबतीने मुंबईत ‘रंगायन’ या संस्थेची उभारणी केली. आर्थिकदृष्ट्या सफल होणाऱ्या व्यावसायिक नाटकांचा तो जमाना होता. विजयाबाईंनी नावीन्य, प्रयोगशीलता आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये जपणारी प्रायोगिक नाटके ‘रंगायन’च्या माध्यमातून आणली. वार्षिक दहा रुपये वर्गणी घेऊन एक हजार सभासद प्रेक्षक बनवले गेले. तब्बल दहा वर्षे ही चळवळ सुरू राहिली. यादरम्यान विजयाबाई आणि विजय तेंडुलकर या जोडीने अनेक
दर्जेदार नाटके
दिली. कुमारी मातांचा नाजूक विषय हाताळणाऱ्या ‘श्रीमंत’ या नाटकाने या चळवळीचा प्रारंभ झाला. मराठी नाट्यसृष्टीचे पुनरुज्जीवन करणारा हा सुवर्णकाळ होता. 1972 मध्ये ‘रंगायन’ ही संस्था बंद पडली, मात्र मराठी नाट्यसृष्टीला वैभव शिखरावर नेण्याचे उद्दिष्ट मात्र विजयाबाईंनी साध्य केले होते. ‘पार्टी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘रावसाहेब’ व ‘पेस्तनजी’ हे विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेले चित्रपट लोकप्रिय झाले. ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘एक शून्य बाजीराव’, ‘एका घरात होते’, ‘मला उत्तर हवंय’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘संध्याछाया’, ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘वाडा चिरेबंदी’ अशी एकाहून एक सरस नाटके विजयाबाईंनी केली. 1973 ते 1996 या काळात त्यांनी व्यावसायिक नाटके केली. आंतरराष्ट्रीय रंगभूमीही बाईंनी गाजवली. इंडो-जर्मन थिएटर प्रोजेक्टसाठी ‘मुद्राराक्षस’, ‘शाकुंतल’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’ अशी नाटके त्यांनी जर्मन रंगभूमीवर दिग्दर्शित केली. जर्मनीतल्या नाट्य रसिकांनी विजयाबाईंचे सर्व प्रयोग डोक्यावर घेतले. प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांबरोबरच टेलिफिल्म्स, दूरदर्शन मालिका, चित्रपट या सर्वच क्षेत्रांत त्यांनी अभिनय व दिग्दर्शनाचे काम केले. अभिनय पद्धतीविषयी व्याख्याने दिली. नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रिमा लागू, प्रतिमा कुलकर्णी ते अलीकडच्या काळातील अमृता सुभाष अशा नाट्य कलावंतांच्या पिढ्या विजयाबाईंनी घडवल्या. विजयाबाई मेहता म्हणजे नाट्यक्षेत्राची मूर्तिमंत प्रयोगशाळाच होती. त्यांनी अभिनय केला, नाट्य दिग्दर्शन केले, चित्रपट दिग्दर्शित केले, टेलिफिल्म्स केल्या, मालिकाही केल्या. शिवाय नाट्य प्रशिक्षक म्हणून अनेक नामांकित रंगकर्मीही नाट्यसृष्टीला दिले. जागतिक रंगभूमीची ओळख महाराष्ट्राला घडवली आणि रंगभूमीवरील हा ‘झिम्मा’ संपवून विजयाबाई आता स्वर्गस्थ झाल्या आहेत. नाट्यशास्त्रज्ञ असलेली ही नाट्यदेवता अखेरच्या प्रवासाला निघाली आहे. देवादिकांनो, पडदा दूर करा, विजयाबाईंचे स्वागत करा!































































