
>> वैश्विक, [email protected]
जुलै महिना पावसाचा तसाच चंद्राचासुद्धा! 20 जुलै 1969 या दिवशी माणसाने चंद्र पादाक्रांत केला. त्यावेळी एसएससीला असलेल्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना या गोष्टीचं अमाप कुतूहल वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी शाळेत अनेक मराठी वृत्तपत्रांचं वाचन झाले. आमचे विज्ञानाचे मास्तर म्हणाले, ‘तुमच्या पिढीने एका वेगवान युगात प्रवेश केला आहे. हा वेग माणसाला कुठवर घेऊन जाईल सांगता यायचं नाही.’
त्यांचं म्हणणं खरं होतं. व्हाएजरच्या रूपाने एक मानवनिर्मित यान सौरमाला ओलांडूनही आता पुढची वाटचाल करतंय. सर्वच क्षेत्रात विज्ञानापायी वेग आलाय. वेगवान प्रवास, वेगवान संपर्कयंत्रणा. काही तासात दूरवर जाण्याची आणि क्षणार्धात पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर राहणाऱ्या सुहृदांशी संवाद करण्याची संधी. यापुढे विज्ञानाच्या वेगाविषयी जेन-झी आणि पुढच्या काय त्या अल्फा-बीटा-गॅमा वगैरे पिढ्यांना काहीच वाटणार नाही, पण 1969 चा मानवी पराक्रम स्तिमित करणारा होता. अर्थात त्याचा आरंभ 1961 मध्ये युरी गागारिनच्या पहिल्या वहिल्या मानवी अंतराळ प्रवासाने झाला होता.
तेव्हापासून जागं झालं चंद्राविषयीचं वैज्ञानिक कुतूहल. पुढे खगोलशास्त्राचा अभ्यास करताना, दुर्बिणीतून वेगवेगळ्या तिथींना चंद्रदर्शन करताना, चंद्राविषयीची अनेक कोडी उलगडत गेली. अहमदाबादच्या ‘पीआरएल’ संस्थेत चंद्रावरती खरीखुरी माती पाहिली आणि त्या अबीर-बुक्क्यासारख्या काळ्या मातीने परप्रकाशित ‘शुभ्र’ चंद्राविषयीचे काही भ्रम आणि कविकल्पना दूर झाल्या. आता चंद्राकडे सजगतेने पाहणं होतं.
आज गोष्ट चंद्रावरच्या विवरांची. म्हणजे सोप्या भाषेत खड्ड्यांची पृथ्वीवरच्या अनेक गावांत आणि शहरांत खड्डे असतातच… मग चांद्रविवरांचं वैशिष्ट्य ते काय? अभ्यासाच्या दृष्टीने या विवरांना खूप महत्त्व आहे. चंद्रावर यान पाठवताना यापैकी खोल खड्डे (विवरं) टाळून योग्य ठिकाणी ते उतरवणं ही एक कसोटीच असते. शेवटच्या क्षणीही सारा डाव कसा फसतो हे आपण चांद्रयान – 2 च्या चंद्रावतरणाच्या वेळी ‘याचि डोळा’ अनुभवलंय. त्यामुळे उद्या चंद्रावर वसाहत करायची तर तिथला ‘प्रदेश’ नीट समजून नको घ्यायला?
तशी छोटी छोटी चांद्रविवरं मोजायची तर त्यांची संख्या खूपच भरेल. परंतु आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने ज्या प्रमुख चांद्रविवरांना मान्यता दिली आहे त्याची संख्या सुमारे 9137 एवढी आहे. त्यापैकी 1675 विवरांचा काल (डेटिंग) निश्चित करता आलेला आहे.
गंमत म्हणजे विवरासाठीचा ‘क्रेटर’ शब्द इंग्लिशमध्ये आलाय तो ग्रीक भाषेतील शब्दावरून आणि त्याचा अर्थ ‘व्हेसल’ किंवा ‘वाडगा’ असा होतो. गॅलिलिओ यांनी सर्वप्रथम, दुर्बिणीद्वारा अवकाशाचा वेध घेतला. त्यावेळी त्यांना म्हणजे 30 नोव्हेंबर 1609 च्या रात्री चंद्रनिरीक्षण करताना लक्षात आलं की, एकतर चंद्राचा आकार पूर्णपणे ‘गोल’ नाही आणि गुळगुळीत गोलक तर मुळीच नाही. उलट चांद्रपृष्ठावर डोंगर, दऱ्या आणि गोलाकार खड्डेसुद्धा आहेत. त्याला त्यांनी ‘कपा’सारखे (कप-लाइक डिप्रेशन) खड्डे म्हटलं.
त्यानंतर 1791 मध्ये जोहान श्रोटर यांनी या खड्ड्यांना विवर (क्रेटर) म्हटलं. पृथ्वीवरच्या ज्वालामुखीजन्य विवरांकडून त्याना हा शब्द सुचला. चंद्रावरही कधीकाळी व्होल्पॅनिक इरप्शन किंवा ज्वालामुखी उसळले होतेच. त्यात भर म्हणजे लाखो अवकाशी दगड-धोंड्यांनी चांद्रपृष्ठावर लाखो वर्षे सतत मारा केला. परिणामी चंद्राचा पृथ्वीवरून ‘मोहक’ वाटणारा ‘चेहरा’ पार खडबडीत झाला.
आजमितीलाही चंद्रावर अशनी पडणं (कमी झालेलं असलं तरी) थांबलेलं नाही. नित्यनवी विवरं तिथे जन्म घेतच असतात. काही वेळा जुन्या विवरांचा आकार बदलतात. 17 मार्च 2013 रोजी चंद्रावर एक मोठा अशनी अंतराळातून दाणकन् कोसळला. या 40 किलो वजनाच्या अशनीने ताशी 90,000 किलोमीटर वेगाने चांद्रपृष्ठाला धडक दिली. ‘नासा’च्या ‘ल्युनार इम्पॅक्ट क्वेटर’चा अभ्यास करणारा एक विभागच आहे.
जगातल्या इतर खगोलीय संस्थासुद्धा अशी मोजदाद करत असतात. कॅनडामधल्या टोरॅन्टो विद्यापीठाशी निगडित असलेल्या अभ्यासकांनी 2018 मध्ये चंद्रावरची 7000 विवरं नोंदली होती. आता हा अभ्यास आणखी सखोल पद्धतीने होत असून चंद्राच्या 38 दशलक्ष वर्ग पृष्ठावरची सुमारे 1,09,000 विवरं नोंदली गेली आहेत. या सर्व विवरांचा अभ्यास सहज करता येतो, कारण चांद्रपृष्ठावर पाणी (नद्या-ओढे वगैरे) नाहीत. वातावरणही फारच विरळ. त्यामुळे वाऱ्याने धूळ उडवून विवर नष्ट केलं असंही घडत नाही. चांद्रपृष्ठावर एकदा झालेला किंवा केलेला ‘इम्पॅक्ट’ तसाच राहतो.
म्हणूनच तर नील आर्मस्ट्रॉन्गच्या आणि इतर चांद्रवीरांच्या बुटांचे ठसे जसेच्या तसे राहिले आहेत. एखादा अशनी तिथे कोसळला तर या ठशांचं अस्तित्व मिटेल आणि तसं झालं तर पृथ्वीवरच्या अभ्यासकांना ते लगेच समजेल.



























































