
हजारो मच्छीमारांना देशोधडीला लावणाऱ्या वाढवण बंदराविरोधात आज भूमिपुत्रांनी जबरदस्त उठाव केला. या बंदराला जोडणाऱ्या प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातील वरोर या गावात खारफुटीसह वृक्षांची पोलीस बंदोबस्तात कत्तल सुरू केली आहे. झाडांची बेसुमार कत्तल करीत असल्याचे समजताच शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार आंदोलन केले. स्थानिक ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमी आणि वाढवण बंदरविरोधी संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. खारफुटी वाचवा, वाढवण बंदर रद्द करा, पर्यावरणाची हत्या थांबवा, पर्यावरणाचा बळी देणारे सरकार हद्दपार करा, अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
स्थानिकांचा विरोध डावलून राज्य व केंद्र सरकार वाढवण बंदर लादत आहे. या बंदराकरिता 32 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड मार्ग बांधण्यात येत असून त्याच्या आड येणारी 1 हजार 578 झाडे तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. त्यात 208 खारफुटींचाही समावेश आहे. आज सकाळपासून महसूल, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात डहाणूच्या वरोर परिसरात दाखल झाले आणि महाकाय यंत्रसामग्रीच्या सहाय्याने खारफुटी हटवण्याचे काम सुरू केले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या वतीने कृषी दिन साजरा होत असतानाच डहाणूतील झाडे आणि खारफुटीची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे.
सुरुवातीपासूनच विरोध
ग्रीनफिल्ड महामार्गासाठी खारफुटी तोडली जात असल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी घटनास्थळी दाखल झाले आणि आपला संताप व्यक्त केला. यावेळी अधिकारी तसेच पोलिसांबरोबर बाचाबाचीही झाली. वाढवण बंदराला सुरुवातीपासूनच स्थानिकांनी विरोध केला असून आता खारफुटी तोडीच्या नावाखाली अन्य वृक्षांचाही बळी दिला जात असल्याने हा संताप आणखी उफाळून आला आहे.
20 जणांना अटक
पोलिसांनी 20 आंदोलकांना आज अटक केली, अशी माहिती वाढवण बंदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. खारफुटीच्या नावाखाली इतर वृक्षांचीही बेकायदा कत्तल करण्यात येत असून याबाबत आम्ही पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागू, असे संघर्ष समितीचे युवा सचिव मिलिंद राऊत यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच वरोर परिसरातील खारफुटी तोडली जात असून नियमांचे काटेकोर पालन होत असल्याचा दावा पालघरचे उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी केला आहे.






























































