
महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीईटीचा पेपर फुटल्यामुळे राज्य सरकारची आधीच नाचक्की झाली आहे. पेपरफुटीवरून विरोधकांसह सत्ताधारी आमदारसुद्धा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर सवाल उपस्थित करत आहेत. टीईटे परीक्षेचे पेपर आग्रा येथे छापले जात होते याची आपल्याला कल्पना नव्हती, अशी कबुली दादा भुसे यांनी आपल्याला खासगीत दिल्याचा दावा मुनगंटीवर यांनी केला आहे. मुनगंटीवर यांच्या या दाव्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे अज्ञान समोर आल्याचे बोलले जात आहे.
विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाने पेपर आग्य्रामध्ये छापले जात असल्याची कोणतीही माहिती आपल्याला दिली नव्हती, अशी कबुली दादा भुसे यांनी खासगीत दिली. सरकारने सर्वच परीक्षांचा आढावा घ्यावा आणि उत्तम पद्धतीने फुल प्रूफ व्यवस्था केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा व्यवस्थेबद्दल जर एकदा अशा पद्धतीची भावना निर्माण झाली तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. नापास होणारा विद्यार्थी उद्या म्हणेल की, चूक माझी नाही, सरकारची आहे, असे ते म्हणाले.





























































