
इतर पक्षांमधून आलेल्यांना मोठी पदे मिळू लागल्याने मिंधेंच्या टोळीतील अन्य इच्छुकांमध्ये ज्युनियर गद्दार कोण, सीनियर गद्दार कोण, सुपीरियर गद्दार कोण असे गट पडले आहेत, असा सणसणीत टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लगावला.
मिंधे गटात सहभागी झालेल्यांना अजूनही काहीतरी मिळेल अशी प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि संघाचे कार्यकर्ते भाजपची एवढी सत्ता असताना या पदांवर आपण कधी बसणार असा प्रश्न विचारत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात सुरू असलेले ‘ऑपरेशन देवेंद्र’ हे राज्यालाच नव्हे तर देशासाठीही धोकादायक आहे. त्यामुळे निर्माण झालेली राजकीय अस्थिरता धोकादायक आहे. पक्षांची तोडफोड, आमदारांची खरेदी-विक्री, आज माझ्यासोबत तर उद्या तुमच्यासोबत असा जो काही निर्लज्जपणा चालला आहे तो धोकादायक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
भ्रष्टाचार करणाऱ्यालाच मंत्री, मुख्यमंत्रीपद मिळते
भाजप आणि मिंधेंनी कितीही फोडाफोडी केली, आमदार-खासदार विकत घेतले तरी जी जनता आहे ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर विश्वास ठेवते. शिवसेनेचा आपल्या कामावर विश्वास आहे, शिवसेनेच्या आमदारांचा आपल्या पक्षावर आणि जनतेवर विश्वास आहे, असेही ते म्हणाले. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे शिवसेनेने लोकांसमोर आणली आहेत. पण भाजप शासनामध्ये जो भ्रष्टाचार करतो त्यालाच मंत्री बनायला किंवा मुख्यमंत्री बनायला अधिकची संधी असते, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
…तर आज देशाची ही स्थिती नसती
जे शिवसेनेसोबत झाले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत झाले, आम आदमी पार्टीसोबत झाले, टीएमसीसोबत झाले ते इतर पक्षांसोबत होऊ शकते. पण त्यामुळे लोकशाहीचे चिंधडे उडाले त्याला जबाबदार कोण? शिवसेना जो न्याय मागत होती तो आधीच मिळाला असता तर आज देशाची जी स्थिती झाली आहे ती झाली नसती, असे ते म्हणाले. आता 30 तारखेला सुनावणी आहे, पण वेळ मिळेल का आणि न्याय मिळेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.






























































