FIFA World Cup 2026 – मेक्सिकोचा 40 वर्षांचा दुष्काळ संपला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यजमान मेक्सिकोने फिफा वर्ल्ड कपमध्ये अखेर 40 वर्षांचा बाद फेरीतील विजयाचा दुष्काळ संपवला. तुफानी पावसामुळे तब्बल एक तास उशिराने सुरू झालेल्या सामन्यात मेक्सिकोने इक्वाडोरला 2-0 अशी धूळ चारत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ 16) फेरीत दिमाखात प्रवेश केला. 1986 नंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत मेक्सिकोचा हा पहिलाच विजय ठरला, हे विशेष.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच मेक्सिकोने आक्रमणांचा भडिमार केला. 22 व्या मिनिटाला ज्युलियन क्विनोनेसने डाव्या बाजूने वेगवान मुसंडी मारत अप्रतिम गोल करून यजमानांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 30 व्या मिनिटाला त्यानेच केलेल्या अचूक पासवर राउल जिमेनेझने सणसणीत फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि मेक्सिकोची आघाडी 2-0 अशी भक्कम केली.

दुसऱ्या सत्रात इक्वाडोरचे मेक्सिकोच्या भक्कम बचावापुढे त्यांचे सर्व डाव निष्फळ ठरले. उलट मेक्सिकोनेच अधिक धोकादायक खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले. भरपाई वेळेत इक्वाडोरचा पिएरो हिंकापिए याला लाल कार्ड दाखवण्यात आले आणि त्यांची निराशा आणखी वाढली.

या विजयासह मेक्सिकोने अझ्टेका स्टेडियमवरील विश्वचषकातील सलग दहा सामन्यांतील अपराजित मालिका कायम राखली. साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून आणि एकही गोल न स्वीकारता बाद फेरीत पोहोचलेल्या मेक्सिकोचा आत्मविश्वास आता कमालीचा उंचावला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत इंग्लंड किंवा काँगोशी होणार आहे.  या सामन्यात मेक्सिकोचा 17 वर्षीय गिल्बर्टो मोरा याने विश्वचषकाच्या बाद फेरीत खेळणारा इतिहासातील दुसरा सर्वात युवा खेळाडू ठरण्याचा मान पटकावला. त्याच्यापुढे केवळ ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले आहे.