
भरमसाठ पॅकेज देणाऱ्या आयआयटी-जेईई आणि नीट परीक्षांच्या कोचिंग क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली आहे. विद्यार्थी मिळवण्यासाठी पळवापळवीचे प्रकार उघडकीस आले असून विद्यार्थी आणण्यासाठी कोचिंग सेंटर्सकडून शिक्षकांना लाखो रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. ‘फिजिक्सवाला’च्या एका वादग्रस्त अंतर्गत ‘रिवॉर्ड पॉलिसी’ने या वादाला तोंड फुटले आहे.
प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांमधील हुशार आणि टॉप रँक आणू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचून आणल्यास फिजिक्सवाला संबंधित शिक्षकांना 2 लाख ते तब्बल 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस देत असल्याचे उघड झाले आहे. फिजिक्सवाला कंपनीचा अर्ध्याहून अधिक महसूल हा ऑफलाइन कोचिंगमधून येत आहे. कंपनी याचा अजून विस्तार करण्याची तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर फिजिक्सवालाने 2027 च्या ऑफलाईन क्लासरूम बॅचसाठी हे धोरण लागू केल्याची माहिती आहे.
फिजिक्सवालाचे स्पष्टीकरण
या वादावर बाजू मांडताना फिजिक्सवालाने म्हटले की, कर्मचाऱ्यांसाठी हा रिवॉर्ड प्रोग्राम आमच्याकडे नवीन नाही. कंपनी वेळोवेळी आपल्या अंतर्गत धोरणांचे पुनरावलोकन करत असते. जर एखाद्या विद्यार्थ्याने कर्मचाऱ्याच्या शिफारशीद्वारे प्रवेश घेतला आणि संबंधित विषयात चांगली रँक मिळवली तर शिफारस करणारे कर्मचारी या धोरणांतर्गत पुरस्कारांसाठी पात्र ठरतात.



























































