‘बालभारती’च्या पुस्तकात गुजराती लोकनृत्य घुसवले, महाराष्ट्राची लोकनृत्ये धडय़ातून वगळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या नवीन शैक्षणिक आराखडय़ानुसार तयार करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या मराठी बालभारती पाठय़पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकातून महाराष्ट्राची लोकनृत्ये गायब झाली आहेत. फक्त ‘दिंडी’चा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र गुजरातसह इतर राज्यांच्या लोकनृत्यांना झुकते माप देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

बालभारती पुस्तकातील ‘लोकनृत्य’ या धडय़ात महाराष्ट्रातील समृद्ध लोकनृत्य परंपरेला जवळपास पूर्णपणे डावलले आहे. केवळ  दिंडी नृत्याचा उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख बनलेली इतर अनेक लोकनृत्ये वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गुजरात, पंजाब, छत्तीसगड आणि बिहारमधील लोकनृत्यांना सविस्तर माहिती व रंगीत चित्रांसह स्थान देण्यात आले आहे.

शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राला लावणी, लेझीम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा अशा विविध लोककला आणि लोकनृत्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. प्राथमिक शिक्षणात राज्यातील विद्यार्थ्यांना या समृद्ध लोकपरंपरेची अधिक व्यापक ओळख करून देणे अपेक्षित आहे. असे असताना पाठय़पुस्तकात इतर राज्यांतील लोकनृत्यांना झुकते माप देणे अयोग्य आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

मजकुरात सोयीनुसार बदल

‘लोकनृत्य’ या धडय़ाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा धडा लोकसाहित्य अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर यांच्या ‘लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ‘भाषा संस्कृती’ या पुस्तकांतील मजकुराच्या आधारे तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मूळ मजकुरातील काही भाग वगळून उर्वरित मजकुरात सोयीनुसार बदल करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावरून शैक्षणिक वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

यासंदर्भात राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद आणि बालभारती यांना पत्र लिहिले. त्याला मुद्देसूद उत्तरे देण्यात आलेली नाहीत. हा कोणता शैक्षणिक आराखडा आहे?, कोणत्या तज्ञांनी दिला?, कोणाची शिफारस आहे?, महाराष्ट्राबाहेरील चार आणि तोंडी लावायला महाराष्ट्रातील एक लोकनृत्यप्रकार ठेवायला नेमके सांगितले कोणी?, कोणी जाब विचारणार की नाही?

– श्रीपाद भालचंद्र जोशी साहित्यिक