
मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वेची लोकल सेवा आज सकाळी पुन्हा विस्कळीत झाली. ना पाणी साचले, ना वायर तुटली… फक्त एका माकडामुळे ही लोकल सेवा तब्बल 15 ते 20 मिनिटे खोळंबली होती. आधीच धो-धो कोसळणारा पाऊस त्यात फलाटांवरील गर्दी यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या लटकंतीमुळे महिन्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
अनेकदा पावासामुळे, पाणी साचल्यामुळे किंवा ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे लोकल सेवा खोळंबलेली असते, मात्र बुधवारी सकाळी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा एका माकडामुळे मंदावली होती. बोरिवली फलाट क्रमांक 1 जवळ ट्रकवर एक माकड बसले. मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवेला ब्रेक लागला. त्यामुळे बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या 2 ते 3 लोकल रद्द झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. लोकल रद्द झाल्याने बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी आणि अंधेरी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
आरपीएफ जवानांची दमछाक
माकड रेल्वे ट्रकवर बसल्याची माहिती मिळताच आरपीएफ जवानांनी तत्काळ धाव घेत माकडाला रुळावरून हटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र या माकडाला हटवण्यासाठी आरपीएफ जवानांची चांगलीच दमछाक झाली. तब्बल 15 ते 20 मिनिटांनंतर माकड रुळावरून हटल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली.





























































