चेंबूर दुर्घटनेचे स्थायी समितीत उमटले तीव्र पडसाद, चौकशी त्रयस्थ समितीमार्फत करा; प्रशासनाला धरले धारेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर दुर्घटनेचे  पडसाद आज स्थायी समितीत उमटले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली तर मान्सूनपूर्व कामे झाल्याचा दावा करणाऱया सत्ताधाऱयांवर प्रशासनाला धारेवर धरण्याची नामुष्की आली. या संपूर्ण घटनेची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी केली जाईल. तसेच चौकशी अहवाल येईपर्यंत संबंधित अधिकाऱयांचे निलंबन करण्याचे निर्देश स्यायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिले.

झाडांची सऱर्हास होणारी कत्तल, काँक्रीटीकरणाच्या नावाखाली झाडांच्या मुळांना पोचणारी हानी, कंत्राटदारांची मनमानी, अधिकाऱयांचा मुजोरपणा यावर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी आवाज उठवला. ‘वृक्ष छाटणी करताना झाडांचा विचार केला जात नाही. झाडांची मुळे कापून पाईप टाकले जातात,’ असे शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी निदर्शनास आणले. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींना तत्काळ निलंबित करा. तसेच विहानच्या  कुटुंबाला महापालिकेच्या वतीने मदत द्या, अशी मागणी त्यांनी केली.

झाडांचे ऑडिट करा

‘काँक्रीटीकरणाने झाडे बाधित होत आहेत, याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. चेंबूरच्या घटनेशी संबंधित सर्वांची चौकशी करा’ व कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव, भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली. नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी झाडांचे ऑडिट करण्याची मागणी केली.