विधीमंडळ अधिवेशन – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसाठी आवश्यक असलेल्या अर्हता निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

विधान परिषदेत शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने संबंधित निर्णय रद्द केल्यानंतर सुधारित आकृतिबंध व विहित कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन अर्हता निश्चित करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून शिक्षकेतर पदभरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे नियोजन असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.

होसकर इमारतीमधील रहिवाशांना न्याय द्या

अंधेरी येथील होसकर इमारत अत्यंत धोकादायक असल्याने मनपाने 2019 मध्ये रहिवाशांचे निष्कासन केले. आठ वर्षांपासून ते रहिवासी बाहेर राहत आहेत. होसकर यांनी ती जागा दुसऱ्या सोहेल बिल्डरला विकली. आता त्या बिल्डरने प्लान सबमिट केला त्यात 21 रहिवाशांचा कुठेही उल्लेख नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासनाने याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे केली.

नालेसफाई वेळेत न करणाऱ्यांवर कारवाई करा

मुंबईतील नालेसफाई 31 मेपर्यंत पूर्ण होणे आवश्यक असते. मात्र यंदा तोपर्यंत 50 टक्केही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पहिल्या पावसात आणि काल मंगळवारच्या दोन तासांच्या पावसातच मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले. दोन्ही द्रुतगती महामार्गांवर पाणी साचले होते. चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी साचले होते. मुंबईकरांना हाल सोसावे लागले. त्यामुळे नालेसफाईचे काम ज्यांना दिले होते त्या ठेकेदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दयाद्वारे केली.

मुंबईत भिकारी वाढलेत, उपाययोजना करा

मुंबईत भीक मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे स्थानक, बाजार, बस स्थानक, ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणाऱ्या व्यक्ती दिसतात. यात लहान मुले आणि वयोवृद्ध महिला-पुरुषांचा वापर करण्यात येतो. पावसाळ्यात तर लहान मुलांना पावसात भिजत ठेवून भीक मागण्याचे प्रकार दिसतात. भीक मागणाऱ्या मुलांना सरकारने शिक्षणासाठी शाळेत पाठवले पाहिजे. जे धडधाकट आहेत अशा भिकाऱ्यांना सरकारने काम दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे केली.

गांधी रुग्णालयातील भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करा

परळ येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील कर्मचारी सेवा निवासस्थान इमारत क्रमांक 4 व 5 मधील कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थान रिक्त करण्याची महाराष्ट्र राज्य विमा कर्मचारी सोसायटीच्या संचालकांनी नोटीस दिली आहे. इमारत क्रमांक 3 व 3 ड मधील 25 रिक्त सदनिका कर्मचाऱ्यांना राहण्यास द्याव्यात अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या रुग्णालयातील उपअधीक्षक डॉ. शंकर रेवणकर यांना निवृत्तीनंतरही उपअधीक्षक पदावर ठेवण्यात आले आहे. रेवणकर यांनी अधीक्षक पदाच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली.

एमपीएसची परीक्षा ऑफलाइन घ्या

मागच्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षा, विशेषतः गट ‘क’च्या परीक्षा खासगी संस्थांद्वारे घेतल्या जात होत्या. त्यात भ्रष्टाचार होणे, पेपर फुटणे, सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार घडत होते. त्यामुळे या परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. एमपीएससीने या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला; मात्र त्या ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र ती ऑनलाइन न घेता ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार पैलास पाटील यांनी केली. यूपीएससीची परीक्षांप्रमाणेच एमपीएससीनेही या परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात, असे आमदार पाटील म्हणाले.