
भोजदरी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्षलागवड कामांतील कथित कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याविरोधात ग्रामस्थांनी पुण्यात सुरू केलेले आमरण उपोषण यशस्वी ठरले. प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी व दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.
भोजदरी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे 1500 वृक्षांची लागवड केली होती, तर सामाजिक वनीकरण विभागाकडून 7500 वृक्षांची लागवड झाल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वृक्ष अस्तित्वात नसतानाही कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून शासननिधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव मते, प्रा. भाऊसाहेब घोडके, ज्ञानदेव उगले, चंद्रकांत मते, प्रल्हाद डोंगरे, एकनाथ डोंगरे, कारभारी सावंत, मारुती वाळुंज, मनोज डोंगरे, दादा उगले, राहुल मते यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी 1993 ते 1998 या कालावधीत इंडो जर्मन प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या ग्लिरिसीडिया (गिरीपुष्प) वृक्षांमुळे शेतीची सुपीकता घटत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. ही झाडे हटवून भोजादेवी मंदिरामागील टेकडीवर देशी वृक्षांची लागवड करून ‘भोजादेवी देवराई’ विकसित करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ‘मनरेगा योजने’त जॉबकार्डधारकांच्या नावावर ठेकेदाराने मजुरीची बिले काढून रक्कम परस्पर काढून घेतल्याचा गंभीर आरोपही गावकऱ्यांकडून करण्यात आला.
30 जुलैपर्यंत अहवालाचे आश्वासन
आंदोलनाची दखल घेत आरएफओ सचिन धिंडले, महेश खोरे व सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर नारळपाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकोैदारांवर कारवाईचा प्रस्ताव सादर करणे तसेच 30 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भोजदरी ग्रामस्थांनी दिला आहे.































































