फाळणीनंतर हिंदुस्थानात आलेल्या लोकांना निर्वासित म्हणणे चूक, ते ‘योद्धे’ होते: मोहन भागवत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

१९४७ च्या फाळणीनंतर जे लोक हिंदुस्थानात आले ते निर्वासित (रिफ्युजी) नव्हते, तर ते ‘संघर्ष योद्धे’ होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. ‘फाळणीनंतर हिंदुस्थानात आलेल्या लोकांना निर्वासित म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी आपल्या मातृभूमी आणि ‘धर्मा’वरील प्रेमापोटी प्रचंड हालअपेष्टा आणि वेदना सहन केल्या’, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

या लोकांनी नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात अनेक पिढ्यांपासून कमावलेली आणि जोपासलेली आपली संपत्ती, जमीन आणि व्यवसाय मागे सोडले आणि हिंदुस्थानात येणे पसंत केले, असे त्यांनी नमूद केले.

भागवत बुधवारी नागपुरात सिंधी समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘सिंधू एज्युकेशन सोसायटी’च्या ७५ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी सांगितले की, फाळणीनंतर लोकांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या बाजूने हिंदुस्थानात येण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना अशा भूमीत राहायचे होते जी हिंदुस्थान आहे, जिथे ते कोणत्याही भीतीशिवाय आपल्या धर्माचे पालन करू शकतील.

‘ते विस्थापित झाले होते, ते निर्वासित नव्हते. त्या वेळी त्यांच्यासाठी वापरला गेलेला हा शब्द चुकीचा होता. ते संघर्ष योद्धे होते ज्यांनी आपल्या मातृभूमीवरील आणि आपल्या श्रद्धेवरील प्रेमापोटी संघर्ष केला. ते एक लढाई हरले पण ती त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे नव्हती’, असे सांगतानाच ते पुढे म्हणाले की, ‘हिंदुस्थानला अखंड ठेवण्याची ती लढाई आपण सर्वांनीच हारली होती. पण त्यांनी काय निवडले? त्यांनी आपले करिअर निवडले नाही, त्यांनी संपत्ती निवडली नाही. त्यांनी देशाची निवड केली, त्यांनी आपल्या धर्माची (श्रद्धेची) निवड केली’.

सरसंघचालकांनी सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, असे क्षण एखाद्या संस्थेने केलेल्या कामाचा आढावा घेण्याची आणि तिच्या ध्येयांचे स्मरण करण्याची संधी देतात.

जीवनातील अडचणींबद्दल बोलताना त्यांनी आग्रह धरला की, प्रतिकूल परिस्थितीत माणसाने हार मानू नये; त्याऐवजी पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

‘परिस्थिती किंवा नशिबासमोर माणसाने लाचार होऊ नये. जो माणूस कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो तोच शेवटी यशस्वी होतो, तर संकटातून पळून जाणारा आधीच पराभव स्वीकारलेला असतो’, असे भागवत यांनी उपस्थितांना सांगितले.

ते पुढे म्हणाले की, रोजगारासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे असले, तरी ते अंतिम ध्येय असू नये.

योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मूल्य-आधारित शिक्षण आवश्यक आहे. असे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकातून मिळत नाही, तर शिक्षकांच्या वर्तनातून आणि ते विद्यार्थ्यांमध्ये जे संस्कार रुजवतात त्यातून मिळते, यावर भागवत यांनी भर दिला.

शिक्षणाचा खरा उद्देश चांगला माणूस घडवणे आणि समाजाच्या कल्याणाची जाणीव असणारी पिढी निर्माण करणे हा आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.