
ठाणे जिल्ह्यात ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी शिवसेना आमदार ॲड. अनिल परब, प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा (एमपीसीबी) मध्ये मनुष्यबळ वाढविण्याची प्रक्रिया सुरू असून, आवश्यकतेनुसार नियमित व कंत्राटी पदांवर भरती केली जाणार आहे.






























































