
बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्यात सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी काही त्रुटींवर बोट ठेवत जोरदार युक्तिवाद सुरू ठेवला आहे. ऍड. प्रमोद सुतार यांनी युक्तिवाद करताना पुराव्यात वाजवी शंका निर्माण होत असल्यास त्याचा लाभ आरोपीस देणे आवश्यक असल्याचा दावा केला. पुढील सुनावणी दि. 8 जुलै रोजी होणार आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीतील अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद केल्यानंतर आता बचाव पक्षाचे वकील आरोपीची बाजू घेऊन युक्तिवाद करीत आहेत.
जिल्हा व सत्र न्यायाधीश पडवळ यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. बचाव पक्षाचे वकील ऍड. सुतार यांनी जोरदार युक्तिवाद करताना, कोठडीतील मृत्यूचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम मृत व्यक्ती आरोपी पोलिसांच्या कायदेशीर ताब्यात होती, हे संशयाच्या पलीकडे सिद्ध करणे सरकार पक्षावर बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र, संपूर्ण खटल्यात सरकार पक्ष हे मूलभूत तथ्यच सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचा दावा ऍड. सुतार यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांच्या निर्णयांचा आधार घेत फौजदारी न्यायशास्त्रनुसार कोठडीतील मृत्यूचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम मयत व्यक्ती आरोपी पोलिसांच्या कायदेशीर ताब्यात होती, हे केवळ साक्षीदारांच्या तोंडी जबाबावरून ठरवता येणार नाही. त्यासाठी तशा लेखी नोंदी नमूद नोंदवहीमध्ये असणे भारतीय पुरावा कायद्याच्या दृष्टीने अभिप्रेत असल्याचेही ऍड. सुतार यांनी नमूद केले.






























































