
नालासोपारा लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून रोशन सुवर्णा या मद्यपीने मयंक लोहार या तरुणाचा खून केला होता. ही घटना ताजी असतानाच आज पनवेल -सीएसएमटी लोकलमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने धिंगाणा घालत प्रवाशांना धमकी दिली. मी चार खून केलेत, आता नंबर तुझा अशी उघड उघड धमकी या तर्राटाने दिली. यामुळे उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका प्रवाशाने धिंगाणा घालत सहप्रवाशांना शिवीगाळ केली. हा दारुडा मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता. सुरुवातीला प्रवाशांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने अश्लील शिवीगाळ करत सहप्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी त्याला शांत राहण्यास सांगितले असता तो अधिकच आक्रमक झाला. यावेळी त्याने मी चार खून केले आहेत, पुढचा नंबर तुझा अशी धमकी दिली.
या वक्तव्यानंतर डब्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तर काहींनी धाडस दाखवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रवाशांच्या सामूहिक हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि संभाव्य अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मी चार खून केलेत; आता नंबर तुझा, तर्राटाची प्रवाशाला धमकी, पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये धिंगाणा pic.twitter.com/qNwCTMuOks
— Saamana Online (@SaamanaOnline) July 2, 2026
पोलिसांकडून शोध
उपद्रवी घटनांमुळे रेल्वेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. धमकी देणाऱ्या दारुड्याचा पोलीस शोध घेत आहेत. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर लोकल गाड्या आणि स्थानकांवरील रेल्वे सुरक्षा दल तसेच रेल्वे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत मद्यधुंद प्रवाशांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित झाली आहे






























































