
अयोध्येतील राममंदिर देणगी घोटाळय़ाचे धागेदोरे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापर्यंत पोहोचले. अयोध्येतील स्टेट बँकेच्या शाखेने वाराणसीतील ‘सैनिक सिक्युरिटीज सर्व्हिस एजन्सी’ला पैसे मोजण्याचे काम दिले होते. मंदिर ट्रस्टने या एजन्सीला आपल्या मर्जीतील लोकांना कामावर ठेवण्यासाठी प्रचंड दबाव आणला होता, असे बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राममंदिर देणगी घोटाळय़ात आतापर्यंत अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडेय, मनीष यादव, रामशंकर उर्फ टिन्नू यादव, सुभाष श्रीवास्तव यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी सहा जण हे सैनिक सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सीचे पगारी नोकर असल्याची धक्कादायक माहिती एसआयटीच्या चौकशीत समोर आली आहे.































































