शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरण- दोषी पोलिसांना बडतर्फ करणार! अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणाचा अहवाल अधिवेशन संपण्यापूर्वी सादर करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना थेट बडतर्फीची कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत आज दिली. बोरसे यांच्या मृत्यूचे नेमके कारण पूर्णपणे स्पष्ट झालेले नसून केमिकल अॅनालिसिसकरिता व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेत आमदार विक्रम काळे, संजय खोडके, सतीश चव्हाण आणि सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचना मांडून या गंभीर प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले. यावर उत्तर देताना  गृहराज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, संशयित पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांच्यासह पोलीस अंमलदार बनगे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे वर्ग करण्यात आला आहे. मृत बोरसे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला असून नागरगोजे यांच्यासह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एका बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले गेले आहे. घाटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पॅनेलने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये (हृदयविकार) असा प्राथमिक निष्कर्ष नोंदवला असला तरी मृत्यूचे अचूक कारण समजून घेण्यासाठी हिस्टोपॅथॉलॉजी आणि व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अंतिम अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध सबळ पुराव्यांसह कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे भोयर यांनी स्पष्ट केले.