
स्वीट मार्ट, हॉटेल्स, ढाबे अशा विविध ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून एफडीएचे धाडसत्र सुरू आहे. या धाडींमध्ये अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या असतानाच गुजरातहून तब्बल अडीच टन वजनाचा बनावट खवा व मावा मुंबईत लक्झरी बसेसमधून दाखल झाला. मात्र एफडीएच्या अधिकाऱ्यांना त्याची टीप मिळताच फाऊंटन हॉटेल जवळ छापा टाकून हा साठा जप्त केला आहे. हा बनावट मावा-खवा गुजरातमधल्या कोणत्या भागातून व कुणासाठी पाठवण्यात आला होता याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई, ठाणे, पालघरसह राज्याच्या विविध भागांमध्ये बनावट खाद्यपदार्थांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. दुधात भेसळ केली तर याद राखा, असा दम मुंढे यांनी देऊनही गुजरातमधून थोडाथोडका नव्हे तर अडीच टन बनावट मावा-खवा मुंबईसाठी पाठवण्यात आला. दोन खासगी ट्रॅव्हल्स बसमधील दरवाजाच्या गॅपमध्ये हा साठा ठेवण्यात आला होता. लक्झरी बसच्या सीटखाली व डिकीतही माव्याची पोती होती.
नमुने प्रयोगशाळेत पाठवले
फाऊंटन हॉटेलजवळ जप्त केलेल्या मावा व खव्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेल्या माव्याचा साठा हा मुंबईतील पाच व्यापाऱ्यांना पाठवला जाणार होता, अशी प्राथमिक माहिती असून त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत. फाऊंटन हॉटेल नाक्याजवळ फिल्डिंग लावली. लक्झरी बसेसवर त्यांनी वॉच ठेवला.
- एफडीएच्या अधिकाऱ्यांना मुंबईच्या दिशेने गुजरातमधून मावा आणि खवा पाठवला जात असल्याचे समजताच त्यांनी मंगळवारी फाऊंटन हॉटेल नाक्याजवळ फिल्डिंग लावली. लक्झरी बसेसवर त्यांनी वॉच ठेवला.
- गुजरातमधून मुंबई, ठाणे व विविध भागांत घोडबंदर मार्गे अनेक खासगी बसेस जात असतात. एफडीएच्या अधिकाऱ्यांना ‘सिफत’ असे नाव लिहिलेल्या दोन ट्रॅव्हल्स बसेसचा संशय आला. त्यांनी या बसेस अडवल्या आणि आतमध्ये जाऊन संपूर्ण बसची झडती घेतली.
- बसच्या सीटखाली तसेच मधल्या भागासह डिकीतही माव्याचा साठा लपवल्याचे दिसून आले. एफडीएने तत्काळ हा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त धनश्री ढाणे यांनी दिली.































































