
ऑपरेश टायगर, ऑपरेशन तुतारी… एक दिवस आपापसातच ‘ऑपरेशन कमळ’ देखील होईल, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. बुधवारी तामिळनाडू येथे सत्ताधारी पक्षातील टीव्हीकेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला असे संजय राऊत यांनी सांगितले.
मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदारांवर हल्ले सुरू आहेत. भाजपने या देशाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे, की भविष्यात सांगावं लागेल की या देशात लोकशाही होती, अशा शब्दात संजय राऊत यांनी देशातील राजकीय परिस्थितीचे वर्णन केले.
तसेच माध्यमांकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीसोबत जाण्यासंदर्भात विचार करू असं विधान केलं असेल तर दुर्दैव असल्याचे राऊत म्हणाले. मी त्यांना छत्रपती संभाजीराजे आणि महत्मा फुले यांच्या भूमिका साकारतात. छत्रपती संभाजीराजे आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी होते आणि त्यामुळे त्यांच्या भूमिका करणारी व्यक्ती धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही, अशी माझ्या सारख्या चाहत्याला खात्री वाटते असं संजय राऊत म्हणाले.
महायुतीच्या संदर्भातील भू्मिका त्यांनी मांडली असेल तर तिथे धर्मद्रोही, रामद्रोही आहेत. राम मंदिरातील दानपेट्या लुटणाऱ्यांच्या पक्षात कुणी जाणार आहे का? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या मिंध्याच्या गटात कुणी जाणार आहे का? कारण हे सगळे रामद्रोही, हिंदूद्रोही एकत्र आहेत. त्याच्यात जे गेले असतील किंवा जाण्याचा विचार करत असतील त्यांची सुद्धा इतिहासात धर्मद्रोही, हिंदूद्रोही, रामद्रोही म्हणून नोंद होईल, असे संजय राऊत म्हणाले.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…




























































