वीज-इंधन दरवाढीमुळे राज्यातील 12 हजारांहून अधिक लघुउद्योग बंद, उद्योगमंत्र्यांची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक मंदी, कोरोनानंतरची प्रतिकूल परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च, वीज व इंधन दरवाढ तसेच कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मागील चार वर्षांत राज्यातील 12 हजारांहून अधिक लघु उद्योग बंद पडल्याची कबुली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावरील उत्तरात उद्योगमंत्र्यांनी ही कबुली दिली. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, विदर्भ, मराठवाडा परिसरातील अनेक औद्योगिक वसाहतीमंधील उद्योग हे वीज दरवाढ, गॅस टंचाई, इतर आर्थिक संकटे व धोरणात्मक अडचणींमुळे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याबाबतही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही प्रमाणात एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे काही उद्योगांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाल्याचेही उद्योगमंत्र्यांनी मान्य केले आहे.