
चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हा नैसर्गिक अपघात नसून ‘प्रशासकीय खून’ असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या ढिसाळ कारभार व निष्काळजीपणामुळे हा बळी गेला असून याप्रकरणी दोषी अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे.
पावसाळ्यापूर्वी झाडांची स्ट्रक्चरल ऑडिट न करणे, धोकादायक फांद्यांची छाटणी न करणे आणि झाडांच्या मुळाभोवती सिमेंट-काँक्रीटीकरण करून त्यांना कमकुवत करणे या सर्व बाबींमुळे महापालिका प्रशासन या सर्व अपघातांना कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांनी केला आहे. चेंबूरमध्ये गेल्या दहा वर्षांत अशोक सुंदर, माजी दूरदर्शन निवेदिका कांचन नाथ, शारदा घोडेश्वर यांना अशाच निष्काळजीपणामुळे जीव गेला आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आंदोलनाचा इशारा
निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या उद्यान विभागाचे संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा. तातडीने चेंबूरमधील जुन्या व धोकादायक झाडांचे ऑडिट करून हवाला सार्वजनिक करा, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करा. झाडे काँक्रीटमुक्त करा आणि पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याप्रकरणी ठोस आणि लेखी कारवाई झाली नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा प्रमोद शिंदे यांनी निवेदनामार्फत प्रशासनाला दिला आहे.





























































