सामना अग्रलेख – विष्णूचा तेरावा अवतारही देश वाचवू शकत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येच्या राममंदिरातून दानपेट्या गायब झाल्या तरी भाजपचे नकली हिंदुत्ववादी निर्लज्जाप्रमाणे ‘‘हिंदुत्वाचे आम्हीच खरे चौकीदार’’ असे सांगतात चीनने भारतीय जमीन ताब्यात घेतली तरी ‘‘भारतात आमच्याशिवाय दुसरे कोणी राष्ट्रभक्त नाहीत’’ असा तोरा हेच लोक मिरवतात. भाजपची राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व म्हणजे ढोंग आहे. त्या अर्थाने ते रावणाचेच वंशज शोभतात. रावण हा भाजपच्या दृष्टीने दुर्गुणी असेलही, पण तो ढोंगी हिंदू नव्हता भाजपप्रमाणे राममंदिरातील दानपेट्यांवर दरोडे टाकत नव्हता हे सकल हिंदू समाजाने लक्षात घेतले पाहिजे. रामाला लुटले, देशाची जमीन लुटली, लोकशाहीसंविधान लुटले तरीही कोणाला याचा खेद, खंत नसेल हेच राजकारण खरे असे वाटत असेल तर या देशाला विष्णूचा तेरावा अवतारही वाचवू शकणार नाही.

अयोध्येतील ‘रामधना’च्या लुटीची चर्चा देशभरात आणि जगभरात सुरू असताना अरुणाचलातील अनेक गावांवर चीनने ताबा मिळविल्याची बातमी चिंता वाढवणारी आहे. हिंदूंच्या भावनांचीही लुटमारच सुरू आहे. चोरांनी श्रीरामालाही सोडले नाही व चोरांना भाजपचे पूर्ण संरक्षण मिळत आहे. राममंदिरात देणग्यांची, दागिन्यांची चोरी झाली, पण मुख्य आरोपी वगळून बाकी सगळ्यांची झाडाझडती पोलीस घेत आहेत. चीनच्या बाबतीतही तेच आहे. चीनने लडाखच्या हद्दीत घुसून भारतीय जमिनीवर ताबा घेतल्याची माहिती सोनम वांगचुक यांनी उघड करताच वांगचुक यांना केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले. आता चीन अरुणाचल प्रदेशात घुसला आहे. अरुणाचलमधील अप्पर सुबनसिरी जिल्ह्याच्या सीमावर्ती ‘नाह’ आदिवासी समाजाने स्पष्ट केले आहे की, चीन भारतीय हद्दीत घुसला आहे. गेल्या सहा वर्षांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने ही घुसखोरी केली. आदिवासींच्या पारंपरिक गुरे चारण्याच्या, शिकारीच्या, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या भूभागावर चीनच्या पीपल्स आर्मीने कब्जा केला. येथे आता अरुणाचलच्या आदिवासींना चिनी आर्मीने मज्जाव केला. इतकेच नव्हे, तर भारतीय हद्दीतल्या या जमिनीवर चीनने रस्ते, लष्करी छावण्या उभ्या केल्या असे निवेदन नाह वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष केरू चाडर यांनी अपर सुबनसिरीच्या जिल्हाधिकारी साहेबांना

चिनी घुसखोरीचे पुरावे

देत सादर केले. त्यात ते म्हणतात, ‘‘साहेब, भारतीय हद्दीतील ही जमीन आम्हा आदिवासींच्या पूर्वजांची आहे. या जमीन, जंगलांवर आमच्या पोटापाण्याची साधने आहेत. ही जमीन म्हणजे आमचे जीवन आहे. वर्षानुवर्षे आम्ही येथे मुक्तपणे वावरतोय.’’ ही जमीन आता चिनी पीपल्स आर्मीच्या ताब्यात गेली आहे. सुबनसिरीमधील ताकसिंग महसूल क्षेत्रात चीन आतपर्यंत घुसला. चीनने आंतरराष्ट्रीय सीमेचा भंग केला. चीन भारतीय हद्दीत त्याचा विस्तार करत आहे, पण आदिवासी समाज वारंवार त्यावर आवाज उठवत असूनही कोणालाच भारतीय सीमांची व राष्ट्रीय सुरक्षेची चिंता दिसत नाही. अरुणाचलच्या आदिवासींचा हा आक्रोश देशाच्या संरक्षण मंत्र्यांच्या कानापर्यंत पोहोचला तरी उपयोग नाही. चीनसमोर गुडघे टेकण्याचे मोदी सरकारचे धोरण असल्याने अशा घुसखोरीकडे लक्ष दिले जात नाही. ‘बांगलादेशी घुसखोर’ हा प. बंगालमध्ये निवडणुकीचा मुद्दा बनवला जातो, पण अरुणाचल-लडाखमधील चीनची घुसखोरी मात्र थंड डोक्याने सहन केली जाते. भारतीय संरक्षण व्यवस्थेचे हे धिंडवडे आहेत. पंतप्रधान मोदी व त्यांचा तथाकथित राष्ट्रभक्त पक्ष चीनच्या या ताबेमारीवर मूग गिळून बसला आहे. स्वतः मोदी परदेश वारीवर आहेत व चीनने अरुणाचलमध्ये घुसखोरी केली. निदान देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तरी या प्रश्नी खुलासा करावा, तर तेदेखील नाही. मोदी व त्यांचे लोक विरोधी पक्षांची मशागत केलेली

राजकीय जमीन चोरण्यात

धन्यता मानत आहेत. रोज उठायचे, पक्ष फोडायचे आणि आमदार-खासदार चोरायचे हीच त्यांची राष्ट्रसेवा. त्याच वेळी चीन भारताची जमीन चोरत आहे यावर त्यांच्या राष्ट्रभक्तीची, हिंदुत्वाची चेतना जागी होत नाही. पाकिस्तान, बांगलादेशवर बोलणारे चीनच्या सैन्यशक्तीपुढे नांगी टाकतात. चीनने गलवान व्हॅलीत घुसखोरी करून आमच्या 20 जवानांची हत्याच केली, पण या चिनी अपराधाबद्दल एखादे ‘ऑपरेशन सिंदूर’ करावे असे पंतप्रधान मोदी यांना वाटले नाही. आता अयोध्येच्या राममंदिरातून दानपेट्या गायब झाल्या तरी भाजपचे नकली हिंदुत्ववादी निर्लज्जाप्रमाणे ‘‘हिंदुत्वाचे आम्हीच खरे चौकीदार’’ असे सांगतात व चीनने भारतीय जमीन ताब्यात घेतली तरी ‘‘भारतात आमच्याशिवाय दुसरे कोणी राष्ट्रभक्त नाहीत’’ असा तोरा हेच लोक मिरवतात. भाजपची राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्व म्हणजे ढोंग आहे. त्या अर्थाने ते रावणाचेच वंशज शोभतात. रावण हा भाजपच्या दृष्टीने दुर्गुणी असेलही, पण तो ढोंगी हिंदू नव्हता व भाजपप्रमाणे राममंदिरातील दानपेट्यांवर दरोडे टाकत नव्हता हे सकल हिंदू समाजाने लक्षात घेतले पाहिजे. रामाला लुटले, देशाची जमीन लुटली, लोकशाही-संविधान लुटले तरीही कोणाला याचा खेद, खंत नसेल व हेच राजकारण खरे असे वाटत असेल तर या देशाला विष्णूचा तेरावा अवतारही वाचवू शकणार नाही. तेराव्या अवताराने समाजात स्वार्थ, अनीती व भ्रष्टाचारालाच मान्यता दिली. कलियुगाचे हे पुढचे टोक आहे.