
जर्मनीसारख्या चार वेळच्या जगज्जेत्या संघाला यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये हद्दपार करताच पॅराग्वेमध्ये आनंदाचा अक्षरशः महापूर उसळला. जोसे कॅनालेने निर्णायक पेनल्टी गोल करताच संपूर्ण स्टेडियम ‘व्हामोस… व्हामोस!’च्या घोषणांनी दणाणून गेले. खेळाडू आनंदाने धावत एकमेकांच्या मिठीत कोसळले, तर हजारो समर्थकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. फुटबॉल इतिहासातील हा क्षण पराग्वेसाठी सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. बाद फेरीमधील सामना अतिरिक्त वेळेनंतर 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये पराग्वेने जर्मनीचा 4-3 असा धुव्वा उडवला.
सामन्याच्या 42 व्या मिनिटाला पॅराग्वेने आघाडी घेतली. मिगेल अल्मिरोनच्या पासवर मातियास गालार्झाने अचूक क्रॉस टाकला आणि जुलिओ एन्सिसोने शानदार हेडर करत चेंडू जाळ्यात धाडला. या गोलमुळे पॅराग्वेने 1-0 अशी आघाडी घेत जर्मनीवर दबाव वाढवला, मात्र दुसऱ्या सत्रात जर्मनीने जोरदार पुनरागमन केले. 52व्या मिनिटाला फ्लोरियन विर्ट्झच्या अचूक क्रॉसवर काई हाव्हर्ट्झने प्रभावी हेडर करत बरोबरी साधली आणि सामना 1-1 असा रंगात आला.
चेंडू जर्मनीकडे,पण विजय पॅराग्वेचा!
स्पर्धेच्या सुरुवातीला फिफा क्रमवारीत 41 व्या स्थानावर असलेल्या पॅराग्वेचा संघ जर्मनीपेक्षा तब्बल 31 स्थानांनी खाली होता. त्यामुळे संपूर्ण सामन्यात अर्थातच जर्मनीचे वर्चस्व स्पष्ट दिसत होते. 75 टक्के चेंडूवरील नियंत्रण, 719 पासेस, 21 फटके, तर पॅराग्वेकडे केवळ 161 पासेस आणि 7 फटके अशी आकडेवारी होती, मात्र आकडे नव्हे तर धैर्य आणि जिद्द विजय ठरवतात, हे पॅराग्वेने दाखवून दिले.
ऑलँडो गिल ठरला ‘भिंत’, पॅनालेने दिला अखेरचा घाव
पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीने सुरुवात केली, पण त्यांना कधीच आघाडी घेता आली नाही. काई हाव्हर्ट्झचा पहिला प्रयत्न गोलरक्षक ऑलँडो गिलने रोखला. त्यानंतर निक वोल्टेमाडेचाही फटका अडवून गिलने जर्मनीला धक्का दिला. पॅराग्वेने दोन संधी दवडल्या तरी बदली खेळाडू जोसे पॅनालेने निर्णायक पेनल्टी गोल करत इतिहास घडवला.
जर्मनीचा गोल नाकारला आणि सामना फिरला…
जर्मनी आणि पॅराग्वे यांच्यांतील सामना रंगतदार अवस्थेत होता. नियमित वेळेच्या अखेरीस सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. 101 व्या मिनिटाला जर्मनीच्या जोनाथन टाहने कॉर्नर किकवर एक उत्कृष्ट हेडर मारून गोल केला. 16 संघांच्या फेरीत आपले स्थान निश्चित झाल्यामुळे संपूर्ण जर्मन संघाने जल्लोष केला. पण त्यानंतर मोरोक्कन मैदानी पंच जलाल झायेद यांना VAR रूममधून पुनरावलोकनाचा संकेत मिळाला. रिप्लेमध्ये दिसले की, गोल झाला त्यावेळी जर्मन बचावपटू वाल्देमार अँटोनचा पॅराग्वेचा गोलरक्षक ऑर्लंडो गिलशी संपर्क झाला होता. बराच वेळ पुनरावलोकन केल्यानंतर पंचांनी तो गोल अवैध ठरवला, ज्यामुळे जर्मन चाहते आणि खेळाडू चकित झाले.
नेयरचा भावनिक निरोप
या धक्कादायक पराभवानंतर जर्मनीचा दिग्गज गोलरक्षक मॅन्युएल नेयरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. 2014 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या जर्मन संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. नेयरने जर्मनीसाठी 124 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 2017 फिफा कॉन्फेडरेशन्स कप जिंकण्यातही त्याचा मोलाचा वाटा होता. नेयरच्या निवृत्तीने जर्मन फुटबॉलच्या एका सुवर्णयुगालाही भावनिक पूर्णविराम मिळाला.
‘आमच्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. आम्ही आणखी एका सामन्यास पात्र होतो. आज आम्ही पॅराग्वेचा खरा स्वभाव दाखवला. जर्मनीलाही माहिती होते की, आम्ही सहज हार मानणार नाही. हा विजय संपूर्ण पॅराग्वेच्या जनतेला समर्पित आहे.’ n गुस्तावो गोमेझ (कर्णधार, पॅराग्वे)






























































