
मोदी सरकार आणि भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला खतपाणी घालणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आता देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या ‘एचडीएफसी बँके’ची धुरा सांभाळणार आहेत. राजीव कुमार यांची पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयुक्त असताना भाजपसाठी केलेल्या कामाची हे बक्षीस असल्याची टीका राजीव कुमार यांच्या नियुक्तीवर होत आहे.
एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी राजीव कुमार यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राजीव कुमार यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीला भारतीय रिझर्व्ह बँकेची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. यासोबतच, 30 जून 2026 पासून त्यांची बँकेचे अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून 4 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याला 5 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱया वार्षिक सर्वसाधारण बैठकीत भागधारकांची मंजुरी दिली जाईल.
एचडीएफसी बँकेचे माजी अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी मार्च 2026 मध्ये राजीनामा दिला होता. त्यानंतर अनुभवी बँकर केकी मिस्त्राr यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बँक कायमस्वरूपी अध्यक्षांचा शोध घेत होती. आता या महत्त्वाच्या पदासाठी राजीव कुमार यांची निवड करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर ट्रोल
राजीव कुमार यांच्या नियुक्तीनंतर सोशल मीडियावर ते ट्रोल होताना दिसत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हिमालयात आपले उर्वरित जीवन व्यतीत करणार असल्याचे जाहीर केले होते. शहरी धावपळीच्या जीवनापासून दूर जात ते स्व-अध्ययनाकडे वळणार असे त्यांनी सांगितले होते. मात्र अचानक एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी कशी स्वीकारली अशी विचारणा केली जात आहे.
निवडणुकीतील हेराफेरीचे गिफ्ट – आप
राजीव कुमार यांनी दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव करण्यासाठी भाजपची बाजू घेतली. भाजप नेत्यांना निवडणुकीत केलेल्या हेराफेरीकडे डोळ्यावर पट्टी बांधून दुर्लक्ष केले. या कामगिरीचे फळ म्हणूनच त्यांना एचडीएफसी बँकेचे अध्यक्षपद मिळाले आहे, अशी टीका आपने केली आहे. लोकशाहीच्या हत्येत सहभागी होणाऱया राजीव कुमार यांना इतिहास माफ करणार नाही, अशी ‘एक्स’ पोस्ट करत आपने म्हटले आहे.




























































